भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात इतिहास रचण्याची संधी असणार आहे. सेंच्युरियनमध्ये टी20 इंटरनॅशनलमध्ये तो मोठा विक्रम करू शकतो. चार सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ आघाडी मिळविण्याच्या प्रयत्नात असतील. डर्बनमध्ये भारताने पहिला सामना जिंकला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत मालिकेत बरोबरी साधली. आता हा सामना जिंकणारा संघ आघाडी मिळवेल. त्याशिवाय मालिका गमावण्याचा धोका टळणार आहे.
अर्शदीप भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज बनू शकतो. 2022 मध्ये साउथॅम्प्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केल्यानंतर तो सतत उल्लेखनीय प्रगती करत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याने आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी केलेली नाही. पहिल्या सामन्यात तो यशस्वी ठरला. पण दुसऱ्या सामन्यात तो अपयशी ठरला. अखेरच्या षटकांमध्ये तो टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आहे. त्याने 86 डावात 90 विकेट्स घेतल्या आहेत. आता त्याचा विक्रम धोक्यात आला आहे. अर्शदीपने 58 डावात 89 विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वरला मागे टाकण्यासाठी त्याला 2 बळींची गरज आहे. अर्शदीप सध्या जसप्रीत बुमराहसोबत संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. बुमराहने 70 टी20 सामन्यात 89 विकेट घेतल्या आहेत. जर आपण एकूण विक्रमावर नजर टाकली तर लेगस्पिनर युझवेंद्र चहल हा भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने 79 डावात 96 विकेट्स घेतल्या आहेत.
अर्शदीप आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनू शकतो. यासाठी त्याला सामन्यात 4 विकेट्स घ्याव्या लागतील. यात तो यशस्वी झाला तर तो भुवनेश्वरला मागे सोडू शकतो. अर्शदीपने यावर्षी आतापर्यंत 22 टी-20 सामन्यात 34 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, भुवनेश्वरने 2022 मध्ये 32 सामन्यांत 37 विकेट घेतल्या होत्या. एकंदरीत हा विक्रम युगांडाच्या अल्पेश रामजानीच्या नावावर आहे. गेल्या वर्षी त्याने 30 सामन्यांत 55 बळी घेतले होते.
हेही वाचा-
एमएस धोनी अडचणीत! चढाव्या लागू शकतात कोर्टाच्या पायऱ्या; प्रकरण जाणून घ्या
विराट किंवा गांगुली नाही, हा खेळाडू आहे भारताचा ऑस्ट्रेलियातील सर्वात यशस्वी कर्णधार, पाहा आकडेवारी
न भूतो न भविष्यति! रोहित शर्माने आजच्याच दिवशी खेळली होती वनडे इतिहासातील सर्वोच्च खेळी!