भारतीय संघाने रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेत सलग 8वा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका संघाला या सामन्यात भारताकडून तब्बल 243 धावांनी पराभव पत्करावा लागला. हा आफ्रिकेचा दुसरा पराभव होता. या पराभवानंतर आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा खूपच निराश झाला. त्याने पराभवानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. आता त्याच्या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. चला तर, बावुमा नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात…
कोलकाताच्या इडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानात पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 326 धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. सर्वांना असे वाटले की, दक्षिण आफ्रिकेसाठी हे आव्हान फार मोठे नसेल. मात्र, त्यांनी सर्वांना चुकीचं सिद्ध केलं. आफ्रिकेचा डाव 27.1 षटकात अवघ्या 83 धावांवरच संपुष्टात आला. यावेळी आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. भारताच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. अशात टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याने लाजीरवाण्या पराभवानंतर मोठी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला बावुमा?
भारताने दक्षिण आफ्रिकेला वनडे विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात कमी 83 धावसंख्येवर सर्वबाद केले. पराभवानंतर बावुमा म्हणाला की, हे आव्हानात्मक असल्याचे त्याला माहितीये. तो म्हणाला की, त्यांना कोलकातामधील परिस्थितीशी जुळवून घेता आले नाही. खेळपट्टीविषयीही बावुमाने मोठे विधान केले.
‘आम्हाला सुधारणेची गरज’
बावुमा म्हणाला, “आम्हाला माहितीये की, हे आव्हानात्मक आहे. आम्ही आव्हानाचा पाठलाग करताना पराभूत झालो. आम्ही आमच्या फलंदाजांशी चर्चा केली होती. पहिल्या 10 षटकात भारताने 90 धावा केल्या, त्यानंतर आम्ही चांगले प्रदर्शन केले. रन रेट रोखला. रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. विराट आणि अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. खेळपट्टीने अगदी तसाच खेळ दाखवला, ज्याची आम्हाला भीती होती. दुर्दैवाने आम्ही हे समजू शकलो नाहीत. संभावितरीत्या आम्ही इथून उपांत्य सामन्यात पुन्हा खेळू शकतो.”
विराटचे वाढदिवशी शतक
खरं तर, विराट कोहली 5 नोव्हेंबर रोजी 35 वर्षांचा झाला. त्याने वाढदिवशीच 49वे वनडे शतक झळकावले. त्याने या सामन्यात 121 चेंडूंचा सामना करताना नाबाद 101 धावा केल्या. यामध्ये 10 चौकारांचा समावेश होता. यासोबतच त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सचिन तेंडुलकर याच्या विक्रमाची बरोबरी केली. या सामन्यात श्रेयस अय्यरनेही 77 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यांच्याव्यतिरिक्त रोहित शर्मा (40) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 29) यांनीही मोलाचे योगदान दिले. त्यामुळेच भारतीय संघ 326 धावांपर्यंत मजल मारू शकला.
आता भारताचा पुढील सामना 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी संघासोबतच चाहतेही खूपच उत्सुक आहेत. (ind vs sa captain temba bavuma statement after south africa biggest odi loss world cup 2023)
हेही वाचा-
पाच बळी घेऊनही सामनावीर न ठरल्यानंतर जडेजा म्हणाला, ” या खेळपट्टीवर तुम्ही…”
दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यावर रोहितचे पुढचे प्लॅनिंग! म्हणाला, “आता फक्त दोन मॅच…”