भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने जवळपास ६ महिन्यांनंतर आयपीएल २०२२मधून दमदार पुनरागमन केले. त्याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व चांगल्या प्रकारे सांभाळले आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. हार्दिक आता मोठ्या काळानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. जबरदस्त पुनरागमनानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉग यांनी हार्दिकचे कौतुक केले.
ब्रॅड हॉग (Brad Hogg) म्हणाले की, “केएल राहुलऐवजी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टी-२० संघाचा कर्णधार असायला हवा. आयपीएलमध्ये त्याने स्वतःचे महत्व सिद्ध केले आहे. तो या क्षणांची वाट पाहत आहे. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी तो नेहमीच चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असतो. पहिल्या टी-२० सामन्यात तो शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजीसाठी आला होता आणि पहिल्या चेंडूपासूनच चौकार मारायला सुरुवात केली होती. अनेकांना हे जमत नाही. जर संघाने सुरुवातीच्या विकेट्स लवकर गमावल्या, तर तो डाव सांभाळू शकतो. सध्या तो जगातील सर्वात मौल्यवान टी-२० क्रिकेटपटू आहे.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात हार्दिक पंड्याने फलंदाजीमध्ये योगदान दिले, पण गोलंदाजीत मात्र त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. फलंदाजी करताना त्याने १२ चेंडूत ३१ धावा केल्या होत्या, तर याच सामन्यात टाकलेल्या एका षटकात तब्बल १८ धावा खर्च केल्या होत्या. हार्दिकला या षटकात विकेट देखील मिळाली नव्हती.
मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारतीय निवडकर्त्यांनी हार्दिकला संधी दिली होती, पण त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. त्यानंतर यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल हंगामातही त्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची निराशा केली होती. सततच्या खराब प्रदर्शनानंतर त्याने स्वतःहून काही काळासाठी विश्रांती घेतली. या काळात हार्दिकने स्वतःच्या फिटनेसवर काम केले आणि आयपीएल २०२२मध्ये जोरदार पुनरागमन केले.
मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला रिटेने केले नव्हते. गुजरात टायटन्ससाठी हा त्यांचा पदार्पणाचा आयपीएल हंगाम होता आणि हार्दिकच्या रूपात त्यांना एक चांगला कर्णधार मिळाला. हार्दिकने गुजरातला पदार्पणाच्या आयपीएल हंगामात विजेतेपद पटकावून दिले. मोठ्या काळापासून गोलंदाजी करू न शकलेल्या हार्दिकने या हंगामात गोलंदाजीही केली आणि संघासाठी सर्वात जास्त धावाही त्यानेच केल्या. आगामी टी-२० विश्वचषकात खेळायचे असेल, तर हार्दिकला चांगले प्रदर्शन करत राहावे लागणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२३मध्ये ‘हे’ ३ खेळाडू होऊ शकतात मालामाल, कसं ते घ्या जाणून
ऋतूराजची विकेट घेताच रबाडाने केली स्टेन, ताहिरशी बरोबरी