Rohit Sharma Stump Mike : – भारताच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या मजेशीर स्वभावाबद्दल सर्वांना माहिती आहे. तो सातत्याने त्याच्या मजेशीर विधानांनी मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. बऱ्याचदा रोहितचे मैदानावरील मजेशीर संवाद स्टंप माईकमध्येही कैद होत असतात. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात शुक्रवारी (02 ऑगस्ट) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात रोहितचा भारतीय खेळाडूसोबतचा मैदानावरील विनोदी संवाद स्टंप माईकमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
त्याचे झाले असे की, श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर पथुम निसांका (56 धावा) आणि दुनिथ वेल्लालगे (नाबाद 67 धावा) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर श्रीलंकेने 8 बाद 230 धावा फलकावर लावल्या. या डावादरम्यान वॉशिंग्टन सुंदर आणि कर्णधार रोहितमध्ये विनोदी प्रसंग घडला.
सुंदर श्रीलंकेच्या डावातील 29 वे षटक टाकण्यासाठी आला होता. यावेळी त्याच्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर वेल्लालगे बाद होण्यापासून थोडक्यात बचावला. त्यानंतर याच षटकातील पाचव्या चेंडूवर पुन्हा सुंदरने शानदार चेंडू टाकला आणि वेल्लालगे पायचीत झाला असावा, असे सुंदरला वाटले. पंचांनी यावर आपला निर्णय न दिल्याने सुंदर कर्णधार रोहितकडे पायचीतसाठी रिव्ह्यु घेण्याची अपील करताना दिसला. परंतु स्वत: रोहित या निर्णयावरुन गोंधळलेला दिसला.
Vintage stump mic banter from @ImRo45 😆
Watch the action from #SLvIND LIVE now on Sony Sports Ten 1, Sony Sports Ten 3, Sony Sports Ten 4 & Sony Sports Ten 5 🤩 📺#SonySportsNetwork #SLvIND #TeamIndia #RohitSharma pic.twitter.com/HYEM5LxVus
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 2, 2024
तो यष्टीरक्षक केएल राहुलकडे पाहू लागला. परंतु राहुलनेही रिव्ह्युसाठी उत्साह दाखवला नाही. तरीही सुंदरच्या मनात कर्णधाराने रिव्ह्युसाठी अपील करावी अशी इच्छा होती. त्यामुळे तो सातत्याने रोहितच्या तोंडाकडे बघत होता. हे पाहून रोहित चिडला आणि त्याला म्हणाला, “तू मला सांग… माझ्याकडे काय बघत आहेस?” यानंतर रोहित जोरजोरात हसायला लागला. नंतर त्यांनी डीआरएस घेतला नाही. रोहितची ही प्रतिक्रिया स्टंप माईकमध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
हेही वाचा –
आयपीएलवाला रूल है क्या! भारतीय खेळाडूंचा मजेशीर संवाद स्टंप माईकमध्ये कैद, व्हिडिओ व्हायरल
चाहत्यांचा हार्टब्रेक! स्टार बॅडमिंटनपटूच्या हाती निराशा, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले
ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेचं प्रोमोशन, मध्य रेल्वेत आता ऑफिसर म्हणून काम करणार!