भारत आणि श्रीलंका (IND vs SL) संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test) सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर श्रीलंकेचा संघ ७ षटकांमध्ये १ विकेट गमावत २८ धावा अशा स्थितीत आहे. पाहुण्या श्रीलंकेला विजयासाठी आणखी ४१९ धावांची आवश्यकता आहे. दरम्यान भारताचा युवा प्रतिभाशाली फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने सामन्यातील भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात खणखणीत अर्धशतक झळकावत एक खास विक्रम बनवला आहे.
श्रेयस दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात अर्धशतक (50+ Runs In Both Innings Of Day-Night-Test) करणारा जगातील केवळ चौथा बनला आहे. तर असा पराक्रम करणारा तो भारताचा पहिलावहिला फलंदाज (First Indian Batsman) आहे.
बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा संघ भारताच्या २५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ १०९ धावांवरच गारद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात खेळताना श्रेयसने ८७ चेंडूंमध्ये ६७ धावा चोपल्या. त्याच्या या खेळीत ९ चौकारांचा समावेश होता. तत्पूर्वी पहिल्या डावात त्याने ९२ धावा फटकावल्या. केवळ ९८ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने त्याने ही शानदार खेळी केली होती.
श्रेयस अय्यरने रचला इतिहास
अशाप्रकारे दिवस-रात्र कसोटीच्या दोन्ही डावात ५० पेक्षा जास्त धावा करत त्याने इतिहास रचला आहे. त्याच्यापूर्वी भारताचा कोणताही कसोटीपटू दिवस-रात्र कसोटीत ही किमया साधू शकलेला नाही. मात्र श्रेयसपूर्वी ३ परदेशी खेळाडूंनी हा कारनामा केला होता. वेस्ट इंडिजच्या डॅरेन ब्रावोने २०१६ साली दुबई कसोटीत पाकिस्तानविरुद्ध पहिल्या डावात ८७ धावा आणि दुसऱ्या डावात ११६ धावा केल्या होत्या.
तर ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथनेही २०१६ मध्येच पाकिस्तानविरुद्ध हा विक्रम केला होता. त्याने ब्रिस्बेनमध्ये झालेल्या त्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १३० धावा आणि दुसऱ्या डावात ६३ धावा केल्या होत्या. तसेच ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅब्यूशेनच्या नावेही या विक्रमाची नोंद आहे. त्याने २ वेळा, २०१९ मध्ये न्यूझीलंड आणि २०२१ मध्ये इंग्लडविरुद्ध ही कमाल कामगिरी केली होती.
दिवस-रात्र कसोटीच्या दोन्ही डावात ५०+ धावा करणारे फलंदाज-
८७ आणि ११६- डॅरेन ब्राव्हो विरुद्ध पाकिस्तान, दुबई २०१६
१३० आणि ६३ -स्टीव्ह स्मिथ विरुद्ध पाकिस्तान, ब्रिस्बेन २०१६
१४३ आणि ५०- मार्नस लॅब्यूशेन विरुद्ध न्यूझीलंड, पर्थ २०१९
१०३ आणि ५१- मार्नस लॅब्यूशेन विरुद्ध इंग्लंड ऍडलेड २०२१
९६ आणि ५२- श्रेयस अय्यर विरुद्ध श्रीलंका, बंगळुरू २०२२
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सच्या युवा फलंदाजाला बनायचंय ‘ज्यूनियर युवराज’, वाचा ‘पावर हिटर’ची पूर्ण प्रतिक्रिया
पाच वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे इंग्लिश गोलंदाज, बुमराहचा असेल बॉलिंग पार्टनर
आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाची नवीन जर्सी लाँच; २८ मार्चला फुंकणार रणशिंग