भारत आणि श्रीलंका (IND vs SL Test Series) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका शुक्रवारी (४ मार्च) सुरू होणार आहे. पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जाईल. हा सामना भारतीय संघासाठी अनेक कारणांमुळे महत्वाचा ठरणार आहे. दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी कसोटी कारकिर्दीतील हा त्याचा १०० वा सामना ठरणार आहे. तसेच रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासाठी हा नियमित कर्णधाराच्या रूपातील त्याचा पहिला कसोटी सामना असणार आहे.
पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळला जाणार असून हा केवळ योगायोग म्हणावा लागेल की, विराट कोहलीने याच मैदानावर भारतात पहिल्यांदा भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. आता याच मैदानावर रोहित शर्माही कसोटी संघाचा नियमित कर्णधार म्हणून पहिल्यांदा खेळणार आहे. रोहित ज्या सामन्यात कर्णधार बनला आहे, तो विराटसाठी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असणार आहे. याच पार्श्वभूमीवर हा सामना विराट आणि रोहित या दोघांसाठी, तसेच भारतीय क्रिकेटसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
रोहित शर्मा बनणार ३५ वा कसोटी कर्णधार
रोहित शर्मा आता भारतीय संघाचा ३५ वा कसोटी कर्णधार बनला आहे. त्याचे वय सध्या ३४ वर्ष आणि ३०८ दिवस आहे आणि त्याला पहिल्यांदाच कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये विशेष बाब ही आहे की, रोहित ज्या वयात कसोटी कर्णधार बनला आहे, त्याआधीच्या दोन कर्णधारांनी त्याच्या वयापेक्षा कमी वयात कसोटी कर्णधारपद सोडले आहे किंवा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
एमएस धोनीने रोहितपेक्षा कमी वय असताना कारकिर्दीतील ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व करून आणि एकूण ९० कसोटी सामने खेळून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तर दुसरीकडे विराटने ६८ कसोटींमध्ये संघाचे नेतृत्व केल्यानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
विराट करणार ८००० धावा पूर्ण
विराट कोहलीने ९९ कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत ५०.३९ च्या सरासरीने ७.९६२ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याला अजून फक्त ३८ धावांची आवश्यकता आहे. मोहालीमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात जर विराट ३८ धावा करू शकला, तर तो ८ हजार कसोटी धावा करणारा ६ वा भारतीय खेळाडू बनले. यापूर्वी सचिन तेंडुलकर (१५९२१), राहुल द्रविड (१३२६५), सुनील गावसकर (१०१२२), वीवीएस लक्ष्मण (८७८१) आणि विरेंद्र सेहवाग (८५०३) यांनी ही कामगिरी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘पचनाची गोळी, सणांत होळी आणि फलंदाजीत कोहली’, सेहवागकडून १०० कसोटी खेळणाऱ्या विराटचे कौतुक
उपकर्णधार हरमनप्रीतचा भांगडा आणि स्म्रीतीचे क्यूट हास्य, विश्वचषकापूर्वी आयसीसीने शेअर केला व्हिडिओ