भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेची सुरुवात दणक्यात केली आहे. मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 27 जुलै) बार्बाडोस येथील ब्रिजटाऊन मैदानावर पार पडला. हा सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला. यासह मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. या सामन्याचा शिल्पकार कुलदीप यादव ठरला. त्याला अफलातून गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. असे असले, तरीही छोटेखानी खेळी साकारणाऱ्या सूर्यकुमार यादव याने आपल्या गगनचुंबी षटकाराने सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे, सूर्याचा हा चेंडू थेट पार्किंगमध्ये जाऊन पडला. आता त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
सूर्याचा षटकार
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. या व्हिडिओत दिसते की, भारतीय संघाच्या डावातील 8वे षटक जेडेन सिल्स (Jayden Seals) टाकत होता. यावेळी सूर्या स्ट्राईकवर होता. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर सूर्याने दुसऱ्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला. सूर्याने यावेळी लेग साईडच्या दिशेने जोरदार फटका मारला. हा चेंडू थेट पार्किंगमध्ये जाऊन पडला. सूर्याचा हा शॉट पाहून गोलंदाजही हैराण झाला.
S̶t̶r̶a̶i̶g̶h̶t̶ ̶o̶u̶t̶ ̶o̶f̶ ̶t̶h̶e̶ ̶b̶o̶o̶k̶@surya_14kumar#INDvWIonFanCode #WIvIND pic.twitter.com/ggXGyw4D7b
— FanCode (@FanCode) July 27, 2023
सूर्याची खेळी
सामन्यातील सूर्याच्या खेळीविषयी बोलायचं झालं, तर त्याने या सामन्यात एकूण 25 चेंडूंचा सामना केला. त्याने यावेळी 19 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 3 चौकारही मारले.
वेस्ट इंडिज स्वस्तात सर्वबाद
सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 23 षटकात सर्व विकेट्स गमावत 114 धावा केल्या होत्या. यावेळी वेस्ट इंडिजकडून शाय होप याने 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 43 धावांची मोठी खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त इतर फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. एकूण 7 खेळाडू 10 धावांचा आकडाही पार करू शकले नाहीत.
भारतीय गोलंदाजांची कमाल
भारताकडून गोलंदाजी करताना यावेळी कुलदीप यादव चमकला. त्याने यावेळी 3 षटके गोलंदाजी करताना 6 धावा खर्च करत सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा यानेही 6 षटकात 37 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. तसेच, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
यावेळी 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ईशान किशन याच्या 52 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 22.5 षटकात 118 धावा करून विजय मिळवला. (ind vs wi 1st batsman suryakumar yadav hit six ball went to car parking see video)
महत्त्वाच्या बातम्या-
सोपा विजय अन् विक्रमांचा पाऊस! पहिल्या वनडेत भारताने बांधली रेकॉर्ड्सची भिंत, एक नजर टाकाच
अर्रर्र! शार्दुलची ‘ती’ चूक अन् विंडीजला फायदा, कर्णधार रोहितने लाईव्ह सामन्यातच केला बाजार, Video Viral