वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिला सामना गुरुवारी (दि. 27 जुलै) बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथे खेळला गेला. आधी कसोटी मालिका आणि आता 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामनाही वेस्ट इंडिजने गमावला. हा सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला. या सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप निराश झाला. पराभवानंतर शाय होपने प्रतिक्रिया दिली. त्याने संघाकडून कुठे आणि काय चूक घडली, ते सांगितले.
शाय होपने सांगितलं पराभवाचं कारण
वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप (Shai Hope) याने पराभवाचं कारण सांगत म्हटले की, “डोक्यात खूप शब्द येत नाहीत. आम्ही ज्या प्रकारे खेळायला पाहिजे होतं, तसे खेळलो नाहीत. आम्हाला अशाप्रकारच्या कठीण खेळपट्टीवर धावा करण्याचे मार्ग शोधावे लागतील. मी कोणतीही सबब करत नाहीये, पण क्रिकेट पाहणारा कोणीही व्यक्ती पाहू शकतो की, इथे काय होत आहे.”
पुढे बोलताना होपने संघाचा युवा गोलंदाज जेडेन सील्स याचे कौतुक केले. तो म्हणाला की, “जेडेन सील्स याच्यावर मेहनत घेतली जाऊ शकते. तो प्रतिभावान खेळाडू आहे. असा खेळाडू, ज्यावर आम्ही गुंतवणूक करू शकतो. मला आशा आहे की, तो मजबूतीने पुढे जाईल. या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र, आम्ही चांगली फलंदाजी केली नाही.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला 23 षटकात सर्व विकेट्स गमावत 114 धावाच करता आल्या. संघाकडून कर्णधार शाय होप याने 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 43 धावांची खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त 7 फलंदाज 10 धावांचा आकडाही पार करू शकले नाहीत. ऍलिक अथानाजे याने 22, तर सलामीवीर ब्रेंडन किंग याने 17 धावांचे योगदान दिले.
यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक 4, तर रवींद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. तसेच, हार्दिक पंड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 22.5 षटकात 5 विकेट्स गमावत 118 धावा केल्या आणि विजय साकारला. मालिकेतील पुढील सामना 29 जुलै रोजी बार्बाडोस येथेच खेळला जाणार आहे. (west indies captain shai hope s reaction after loosing against india by 5 wickets in 1st odi)
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच वनडेत जडेजा-कुलदीप जोडीने घडवला इतिहास, बनली ‘असा’ पराक्रम करणारी पहिली भारतीय स्पिन जोडी
भारताने विजय मिळवूनही कर्णधार रोहित दु:खीच! म्हणाला, ‘अपेक्षाच नव्हती की, आम्ही 5…’