शनिवारी (दि. 29 जुलै) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा वनडे सामना यजमानांच्या नावावर राहिला. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर विंडीजने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने प्रतिक्रिया दिली. त्याने यादरम्यान फलंदाजांवर राग काढला.
काय म्हणाला हार्दिक?
सामन्यानंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) म्हणाला की, “आज खेळपट्टी चांगली होती. हे पहिल्या सामन्याप्रमाणे नव्हते. मात्र, आमच्या फलंदाजांनी खराब शॉट खेळले आणि विकेट्स गमावल्या. शार्दुलने चांगली गोलंदाजी केली आणि त्याने आमच्या आशा जिवंत ठेवल्या. निराशा झाली, पण खूप काही शिकायला मिळाले. ज्याप्रकारे सलामीवीर फलंदाजांनी फलंदाजी केली, ज्याप्रकारे ईशान किशनने फलंदाजी केली, हे भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे आहे.”
विश्वचषकाच्या तयारीवरही भाष्य
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) तयारीविषयी भाष्य करताना हार्दिक म्हणाला, “मी वनडे विश्वचषकासाठी तयारी करत आहे. त्यामुळे काही अधिक षटके गोलंदाजी करत आहे. हळूहळू पूर्णपणे गोलंदाजी फिटनेसच्या दिशेने जात आहे. यावेळी मी कासव आहे, ससा नाही. मालिका 1-1ने बरोबरीवर आहे आणि अखेरचा सामना निर्णायक असेल. पुढील सामना प्रेक्षकांसोबतच खेळाडूंसाठीही रंजक असेल.”
फलंदाजी आणि गोलंदाजीत अपयशी
खरं तर, दुसऱ्या वनडेत नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील नव्हते. वनडे विश्वचषक पाहता संघ व्यवस्थापनाने त्यांना विश्रांती दिली होती. अशात या सामन्यात हार्दिक पंड्याने नेतृत्व केले. मात्र, तो फलंदाजीत चमकला नाही. तो फक्त 7 धावा करून बाद झाला. तसेच, गोलंदाजी करताना त्याने 6.4 षटके टाकून 38 धावा खर्च केल्या. त्याला यावेळी विकेट घेता आली नाही.
भारताचा दारुण पराभव
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 40.5 षटकात सर्वबाद 181 धावा केल्या होत्या. यामध्ये ईशान किशन (Ishan Kishan) याच्या 55 आणि शुबमन गिल याच्या 34 धावांचा समावेश होता. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने 36.4 षटकात 4 विकेट्स गमावून 182 धावा केल्या आणि सामना 6 विकेट्सने नावावर केला. (ind vs wi 2nd odi skipper hardik pandya blamed the batsmen after defeat)
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजकडून भारताचा निराशाजनक पराभव, 200 धावांचा आकडा पार करण्यात फलंदाज फ्लॉप
BREAKING: स्टुअर्ड ब्रॉडकडून निवृत्तीची घोषणा! ‘या’ दिवशी करणार क्रिकेटला अलविदा