भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी (११ फेब्रुवारी) खेळला गेला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलेल्या भारतीय संघाने (team india) तिसरा सामनाही जिंकला. भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजला व्हाईटवॉश (३-०) दिली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतर संघाने जबरदस्त पुनरागमन केले.
काही दिवसांपूर्वी भारतीय संघाने दक्षिण अफ्रिका दौरा केला होता. दक्षिण अफ्रिकेतील कसोटी मालिकेत भारताला १-२ असा, तर एकिदवसीय मालिकेत संघाला ०-३ असा व्हाईटवॉश मिळाला होता. नियमित कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) अनुपस्थित असल्यामुळे केएल राहुलने त्यावेळी एकदिवसीय संघाचे नेतृत्व केले होते. परंतु वेस्ट इंडीजविरुद्धच्या या मायदेशातील एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार रोहितचे संघात पुनरागमन झाले आणि संघानेही जबरदस्त कामगिरी करून मागच्या मालिकेतील कसर भरून काढली आहे.
दरम्यान, मागच्या एकदिवसीय मालिकेत स्वतः व्हाईटवाश मिळालेला असताना, पुढच्याच एकदिवसीय मालिकेत विरोधी संघाला व्हाईटवॉश दिल्यामुळे भारतीय संघाचे कौतुक केले जात आहे. ही पहिलीच वेळ नाही जेव्हा भारतीय संघाने अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी १९८२ साली भारतीय संघाने अशीच कामगिरी केली होती. त्यावर्षी संघाला इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत ०-२ असा व्हाईटवॉश मिळाला होता. पण पुढच्या एकदिवसीय मालिकेत भारताने दक्षिण अफ्रिकेला व्हाइटवॉश दिला. दक्षिण अफ्रिकेविरुद्धची ही तीन सामन्यांची मालिका मायदेशात खेळली गेली होती, तर इंग्लंडविरुद्ध मात्र संघ विदेशात खेळला होता.
दरम्यान, शुक्रवारच्या सामन्याचा विचार केला, तर कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना संघाने २६५ धावा केल्या. परंतु सलामीवीर रोहित आणि शिखर धवन स्वस्तात बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्य विराट कोहलीला एकही धाव करता आली नाही आणि तो विकेट गमावून बसला. अशात जेव्हा संघाला गरज होती, त्यावेळी श्रेयस अय्यर (८०) आणि रिषभ पंत (५६) यांनी महत्वाची खेळी केली. या दोघांनी ११० धावांची भागीदारी केली.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघाने खराब प्रदर्शन केले आणि मालिकेतील सलग तिसरा पराभव पत्करला. वेस्ट इंडीजचा एकही खेळाडू ५० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. परिणामी संघ अवघ्या १६९ धावांवर सर्वबाद झाला. उभय संघामध्ये आता १६ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. टी२० मालिकेचे सामने १६, १८ आणि २० फेब्रुवारीला खेळले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
INDvsWI – टीम इंडियाचा दमदार कर्णधार! मालिका विजयासह रोहितने पाडलीये विक्रमांची रास, वाचा
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिका बनलीये ऐतिहासिक; २७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडलाय
मालिकावीर प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! बुमराह-जहीर खानसारख्या मोठ्या दिग्गजांना टाकले मागे