29 जून रोजी टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनली. त्यानंतर एका आठवड्यातच 6 जुलैला भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सध्या 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला 13 धावांनी पराभव पत्कारावा लागला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेनं 20 षटकांत 9 गडी गमावून 115 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ 19.5 षटकांत 102 धावांवरच गारद झाला. टीम इंडियाच्या या पराभवानंतर अनेक मोठे विक्रम रचले गेले आहेत.
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 116 धावांचं छोटेखानी लक्ष्यही गाठू शकला नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, भारताविरुद्ध कोणत्याही संघानं बचाव केलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी टीम इंडियाला 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 127 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नव्हता.
झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघ अवघ्या 102 धावांत गारद झाला. 2016 नंतर टीम इंडियाची टी20 आंतरराष्ट्रीयमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताीय संघाची सर्वात कमी धावसंख्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. कांगारुंविरुद्ध 2008 मध्ये भारतीय संघ अवघ्या 74 धावांत गारद झाला होता.
यावर्षी भारतीय संघाला टी20 फॉरमॅटमध्ये पहिल्याच पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघानं वर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानचा 3-0 असा पराभव केला होता. यानंतर टी20 वर्ल्ड कपमध्ये सलग 8 सामने जिंकले. मात्र आता संघाला झिम्बाब्वेविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं.
झिम्बाब्वेनं घरच्या मैदानावर केलेला हा सर्वात लहान लक्ष्याचा बचाव आहे. यापूर्वी 2021 मध्ये झिम्बाब्वेनं पाकिस्तानविरुद्ध 118 धावांचा बचाव केला होता. मात्र आता भारताविरुद्ध अवघ्या 115 धावांचा बचाव करून झिम्बाब्वेनं इतिहास रचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाची नाचक्की! दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव
टी20 विश्वचषक ट्रॉफी कोणत्या धातूची बनली असते? ट्रॉफीचं वजन किती असतं? जाणून घ्या सर्वकाही
झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक आहेत शुबमन गिलचे फॅन, भारतीय कर्णधारावर केला कौतुकाचा वर्षाव