भारतीय महिला संघ सध्या न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक खेळत आहे. शनिवारी (१२ मार्च) भारत आणि वेस्ट इंडीज महिला संघ आमने सामने होते. भारतीय महिला संघाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि वेस्ट इंडीजपुढे विजयासाठी मोठे लक्ष्य उभे केले. यामध्ये उपकर्णधार हरमनप्रीत कौरच्या शतकी खेळीचा समावेश होता. हरमनप्रीत या खेळीनंतर एक मोठा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे.
हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने या सामन्यात एकूण १०७ चेंडू खेळले आणि यामध्ये १०९ धावा केल्या. वेस्ट इंडीजच्या एलिया आलेने हिच्या चेंडूवर हरमनप्रीत यष्टीरक्षकाच्या हातात झेल देत बाद झाली. हरमनप्रीतच्या १०९ धावांमध्ये १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
सामन्यात मारलेल्या या दोन षटकारांच्या मदतीने हरमनप्रीत आयसीसी महिला विश्वचषकात (ICC Women’s World Cup 2022) स्वतःचे २० षटकार पूर्ण करणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) महिला विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारी दुसरी भारतीय खेळाडू आहे, जिच्या नावावर विश्वचषकात ७ षटकारांची नोंद आहे.
दरम्यान, हरमनप्रीतने अजून एक मोठा विक्रम या सामन्यात नावावर केला. भारतीय संघासाठी महिला विश्वचषकात सर्वाधिक तीन शतके करणारी हरमनप्रीत पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. विश्वचषकात मंधाना आणि कर्णधार मिताली राज या दोघांच्या नावावर प्रत्येक दोन-दोन शतके आहेत.
सामन्याचा विचार केला, तर भारतीय कर्णधार मिताली राजने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मर्यादित ५० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर ३१७ धावा केल्या. यामध्ये मंधानाने ११९ चेंडूत सर्वाधिक १२३ धावा केल्या. तर हमनप्रीत भारतासाठी दुसरी सर्वात मोठी खेळी करणारी फलंदाज ठरली. कर्णधार मिताली राज अवघ्या ५ धावा करून तंबूत परतली.
तसेच ३१८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला सर्वबाद १६२ धावाच करता आल्या. त्यामुळे १५५ धावांनी भारताने विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या –
हरमप्रीतची मोठी कामगिरी, बनली विश्वचषक स्पर्धेत तीन शतके ठोकणारी पहिली भारतीय महिला
‘हा’ संघ आहे दिवस-रात्र कसोटीतील ‘बादशाह’, जिंकलेत दहाच्या दहा सामने






