भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी अष्टपैलू खेळाडू रुमेली धरने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता या यादीत ३८ वर्षीय अष्टपैलू रुनेली धर देखील सहभागी झाली आहे. तिने ही माहिती स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावरून दिली आहे.
रुमेली धर (Rumeli Dhar) हिने स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावरून पोस्ट केली की, “पश्चिम बंगालच्या श्यामनगरमध्ये सुरू झालेले माझी क्रिकेट कारकीर्द आता अखेर संपत आहे. आता मी क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारातून निवृत्ती घेण्याची घोषणा करत आहे. या प्रवासात अनेक चढ उतार आले. भारतीय क्रिकेट संघासाठी खेळणे आणि २००५ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणे माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय असेल. या प्रवासात अनेकदा दुखापतीमुळे माझी कारकीर्द रुळावरून खाली घसरली. पण प्रत्येक वेळी मी मजबूतीने पुनरागमन केले. या क्षणी मी बीसीसीआय, सर्व मित्रपरिवार आणि सहकारी खेळाडू यांनी केलेल्या सहकार्यासाठी आभार मानते.”
View this post on Instagram
दरम्यान , या माजी अष्टपैलू खेळाडूचा जन्म ९ डिसेंबर १९८३ मध्ये बंगालच्या कोलकाता शहरात झाला. तिने स्वतःचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण २००३ साली इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यातून केले. कारकिर्दीत तिने एकूण ४ कसोटी, ७८ एकदिवसीय आणि १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये तिच्या नावापुढे २३६ धावांची नोंद आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९६१, तर टी-२० क्रिकेटमध्ये १३१ धावा रुमेली धरने केल्या आहेत. मधल्या काळात तिला काही गंभीर दाखापतीही झाल्या, पण त्यातून ती सावरली आणि २०१८ मध्ये संघात पुनरागमन केले।
इंग्लंडविरुद्ध २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर २००५ मध्ये रुमेलीने विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. असे असले तरी, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. दुखापतीनंतर २०१८ मध्ये तिने राष्ट्रीय संघात पुनरागमन केले, पण वाढती स्पर्धा आणि युवा खेळाडूंना संधी मिळत असल्यामुळे निवडकर्त्यांकडून तिच्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे पाहिले गेले.
महत्वाच्या बातम्या –






