भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) संघ पुन्हा एकदा एका मोठ्या आयसीसी (ICC) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. 8 मार्च रोजी जेव्हा हे दोन्ही संघ मैदानात उतरतील, तेव्हा क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाईल. आजवर आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये जे कधीच घडले नाही, ते आता पाहायला मिळणार आहे. जगातील हे दोन सर्वोत्तम संघ जेव्हा भिडतील, तेव्हा क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळेल यात शंका नाही.
टी20 विश्वचषक 2026 (Icc T20 international world cup 2026) च्या फायनलमध्ये जेव्हा भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येतील, तेव्हा ते जगातील पहिले असे दोन संघ ठरतील ज्यांनी आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटचे (कसोटी, वनडे आणि टी-20) फायनल एकमेकांविरुद्ध खेळले आहेत.
यापूर्वी या दोन संघांमधील महत्त्वाचे सामने खालीलप्रमाणे झाले आहेत. साल 2000 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि न्यूझीलंड पहिल्यांदा आयसीसी फायनलमध्ये भिडले होते तेव्हा या स्पर्धेला आयसीसी नॉक आऊट म्हटले जायचे. या अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 4 धावांनी पराभव केला होता. तसेच साल 2021 कसोटी क्रिकेटच्या या पहिल्यावहिल्या फायनलमध्येही हेच दोन संघ समोरासमोर होते. तिथेही न्यूझीलंडने बाजी मारली आणि जेतेपद पटकावले. त्यानंतर साल 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गेल्याच वर्षी झालेल्या या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडवर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.
आता 2026 मध्ये हे दोन्ही संघ टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भिडणार आहेत. म्हणजेच कसोटी (WTC), वनडे (चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कप) आणि टी-20 (वर्ल्ड कप) अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकमेकांविरुद्ध फायनल खेळणारी ही पहिलीच जोडी ठरेल. असा पराक्रम आजवर क्रिकेट विश्वात कोणत्याही दोन संघांना करता आलेला नाही. दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. आता 8 मार्चला कोणता संघ बाजी मारतो आणि चॅम्पियन ठरतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.






