धरमशाला। भारत आणि श्रीलंका संघात (India vs Sri Lanka) सध्या ३ सामन्यांची टी२० मालिका (T20 Series) खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना (2nd T20I) धरमशालामधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. शनिवारी (२६ फेब्रुवारी) होणाऱ्या या दुसऱ्या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. दरम्यान, या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी२० सामना भारताने जिंकला असून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी असणार आहे. तसेच दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याबरोबरच आव्हान कायम ठेवण्याचा श्रीलंका संघाचा प्रयत्न असेल.
सामन्यावर पावसाचे सावट
दुसऱ्या टी२० सामन्यात पाऊस अडथळा ठरण्याची शक्यता आहे. कारण, धरमशालामधील हवामान अंदाजानुसार शनिवारी ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची दाट शक्यता आहे. तसेच शनिवारी स्टेडियमच्या फोटोंनुसार मैदानही कव्हरने झाकण्यात आले होते. त्यामुळे या सामन्यात पावसाचे सावट असणार आहे.
विशेष म्हणजे भारताच्या २०१९ आणि २०२० मध्ये धरमशाला येथील अखेरच्या दोन आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान देखील धूवांधार पाऊस झाला होता. आता शनिवारीदेखील असेच चित्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Rain Forecast).
महत्त्वाचे म्हणजे बीसीसीआयने धरमशालेतील सामन्यासाठी ५० टक्के प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हा सामना झाल्यास स्टेडियममध्ये संघांना प्रोत्साहन देताना प्रेक्षक दिसू शकतात.
अशी असेल खेळपट्टी
धरमशालाची खळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांनाही मदगार ठरली आहे. त्यामुळे या खेळपट्टीचा अंदाज बांधणे तसे कठीण आहे. त्याचबरोबर धरमशाला येथे झालेल्या आत्तापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचा विचार करायचा झाल्यास याठिकाणी ९ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ४ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत, तर २ सामने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तसेच या मैदानावरील एक सामना रद्द करण्यात आलेला आहे आणि २ सामन्यांचे निकाल लागलेले नाहीत.
दुसऱ्या टी२०साठी यातून निवडले जातील अंतिम ११ जणांचे संघ
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, मयंक अगरवाल, कुलदीप यादव, आवेश खान, मोहम्मद सिराज, रवी बिश्नोई
श्रीलंका संघ – पाथम निसंका, कामिल मिश्रा, जेनिथ लियानागे, चारिथ असलंका, दिनेश चंडीमल(यष्टीरक्षक), दसुन शनका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा, जेफ्री वेंडरसे, लाहिरू कुमारा, धनंजय डी सिल्वा, निरोशान डिकवेल्ला, दनुष्का गुलतिलका, बिनुरा फर्नांडो, अशियान डॅनियल, शिरान फर्नांडो.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंचे झाले पुनरागमन
व्हिडिओ: दुसऱ्या टी२० सामन्यासाठी टीम इंडिया धरमशालेत हजर; पण नाही झालं पारंपारिक स्वागत