भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंका संघाला पराभूत केले आहे. श्रीलंका संघावर भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. रविवारी कोलंबो येथे आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला. या सामन्यात श्रीलंका संघाला 50 षटकांमध्ये 262 धावा करता आल्या. श्रीलंका संघाकडून सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरलेल्या खेळाडूंनी 49 धावांची भागीदारी करत दमदार सुरुवात केली. परंतु त्यानंतर श्रीलंका संघातील फलंदाजी फळी ढासळू लागली होती.
श्रीलंका संघाकडून चमिका करुणारत्नेने नाबाद 43 धावा, कर्णधार दासुन शनाकाने धावा 39 आणि चरित अस्लंकाने 38 धावा केल्या. त्याचबरोबर श्रीलंका संघाला प्रत्युत्तर देत भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने नाबाद 86 धावा, ईशान किशनने 59 आणि पृथ्वी शॉ 43 धावांची उत्कृष्ट फलंदाजी केली. भारतीय संघाने 36.4 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात हा सामना जिंकला.
पराभवानंतर शनाकाने दिली प्रतिक्रिया
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर कर्णधार दासुन शनाका याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ‘आम्ही चांगली सुरुवात केली. पण चेंडू थोडासा अडखळत येत होता. भारतीय गोलंदाजांचे खरोखरच कौतुक करावे लागेल. त्यांनी शानदार गोलंदाजी केली.’
पुढे शनाकाने आक्रमक खेळल्याबद्दल भारतीय फलंदाजांचे कौतुक देखील केले. तो म्हणाला की, ‘भारतीय संघाने अत्यंत आक्रमक फलंदाजी केली. त्यांच्या बॅटवर व्यवस्थितपणे चेंडू जात होता. त्यामुळे आम्हाला चेंडूचा वेग बदलण्याची गरज होती. भारतीय संघाचे फलंदाज किती चांगले आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु पुढच्या सामन्यात आम्ही आमच्या गोलंदाजीमध्ये सुधारणा नक्की करू.’
शनाकाने घेतली परेराची जागा
कुसल परेराच्या जागी दासुन शनाकाला कर्णधारपद देण्यात आला आहे. इंग्लंड दौर्यावर गेलेला श्रीलंका संघाचा कर्णधार परेरा होता. पण खेळाडूंच्या कराराच्या वादामुळे तसेच खराब कामगिरीमुळे श्रीलंकेच्या मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद शनाकाकडे सोपविण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांत श्रीलंका वनडे संघाचे नेतृत्व करणारा शनाका दहावा कर्णधार आहे. यापूर्वी शनाका 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेचे नेतृत्व केले होता. या मालिकेत श्रीलंकेने पाकिस्तान संघाचा पराभव केला होता.
त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा मुख्य संघ इंग्लंडच्या दौर्यावर आहे. त्यामुळे शिखर धवनला श्रीलंका दौर्यावर भारतीय संघाचे नेतृत्व संभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धवन ब्रिगेडचा पहिल्याच वनडेत श्रीलंकेला धोबीपछाड, कर्णधाराने ‘या’ खेळाडूंना दिले श्रेय
अय्योव! कोलंबो वनडेदरम्यान अचानक मैदानात आला पतंग, पुढे काय घडले एकदा पाहाच
मिड ऑनवर धवनचा सुपर झेल, मग गब्बर स्टाईल सेलिब्रेशनही; हा शानदार क्षण तुम्ही पाहिलाय ना?