भारत आणि श्रीलंकामध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव केला. यासह भारताने वनडे मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या विजयाचे श्रेय कर्णधार शिखर धवनने संघाच्या अष्टपैलू कामगिरीला दिले आहे. धवनने या सामन्यात 95 चेंडूंत 6 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 86 धावांची उत्कृष्ट खेळी केली आहे.
त्याचबरोबर धवनने पृथ्वी शॉसह (43 धावा) पहिल्या विकेटसाठी 58 धावा जोडल्या. दुसर्या विकेटसाठी ईशान किशनसोबत (59 धावा) 86 धावांची भागीदारी आणि मनीष पांडेसह (26 धावा) तिसर्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. भारताने 36.4 षटकांत तीन विकेट्स देत श्रीलंकेच्या 263 धावांचे लक्ष्य गाठले. या खेळीदरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा हजार धावा पूर्ण करणारा धवन दहावा भारतीय फलंदाज ठरला आहे.
तर गोलंदाजीमध्ये दीपक चाहरने 37 धावांवर 2 विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने 48 धावा देत दोन विकेट्स आणि युजवेंद्र चहलने 52 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आक्रमक गोलंदाजी करत श्रीलंका संघाचे 9 गडी बाद करत 262 धावांवर अडविले. तर कृणाल पांड्याने 10 षटके टाकत 26 धावा दिल्या व एक विकेट घेतली.
भारतीय कर्णधार शिखर धवनची प्रतिक्रिया
या सामन्यानंतर धवन म्हणाला, “आमचे सर्व खेळाडू खूप परिपक्व आणि आक्रमक आहेत. त्यांनी आज उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि मला यामुळे खूप आनंद झाला आहे. तिन्ही फिरकीपटू चहल, कुलदीप आणि कृणाल यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला सामन्यात पुनरागमन करुन देण्यास मदत केली.”
त्याचबरोबर धवन पुढे म्हणाला की, “पृथ्वी आणि ईशानला दुसर्या बाजूला तटस्थपणे उभे राहून फलंदाजी करताना पाहून खूप चांगले वाटले. महत्त्वाचे म्हणजे मी त्यांना काळजीपूर्वक खेळायला सांगत होतो. या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आला असून त्यांनी पहिल्या 15 षटकांतच सामना संपविला होता.”
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाची प्रतिक्रिया
दुसरीकडे आपल्या नेतृत्त्वाखाली पहिलाच सामना गमावणारा श्रीलंकेचा कर्णधार शनाका म्हणाला की, “आम्ही चांगली सुरुवात केली पण त्यानंतर भारतीय संघाने चांगली गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने फलंदाजीमध्ये आक्रमक सुरुवात केली होती. आम्हाला चेंडूच्या गतीमध्ये बदल करण्याची गरज होती. कारण चेंडू बॅटवर सहजतेने येत होता. पुढच्या सामन्यात आम्ही त्यात सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.”
महत्त्वाच्या बातम्या-
अय्योव! कोलंबो वनडेदरम्यान अचानक मैदानात आला पतंग, पुढे काय घडले एकदा पाहाच
मिड ऑनवर धवनचा सुपर झेल, मग गब्बर स्टाईल सेलिब्रेशनही; हा शानदार क्षण तुम्ही पाहिलाय ना?
वयाच्या ३४व्या वर्षी ‘या’ अष्टपैलूचा मोठा विक्रम, ओलांडला ५०० विकेट्स अन् १२००० धावांचा आकडा