वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पहिला वनडे सामना गुरुवारी (27 जुलै) बार्बाडोस येथे खेळला गेला. अनुभवी भारतीय संघाने या सामन्यात यजमान वेस्ट इंडीज संघावर 5 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. चार बळी मिळवणारा कुलदीप यादव सामन्याचा मानकरी ठरला.
कसोटी मालिकेतील विजयाचा आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने या सामन्यात चांगली सुरुवात केली. तिसऱ्या षटकात हार्दिकने कायले मेयर्सला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मुकेश व शार्दुल यांनी प्रत्येकी एक बळी घेत वेस्ट इंडीजची अवस्था 3 बाद 45 केली. कर्णधार शाई होपने 43 धावांचे योगदान दिले. एक वेळ यजमान 88 धावांवर तीन अशा स्थितीत असताना कुलदीप यादव व रवींद्र जडेजा या फिरकी जोडीने आक्रमणाची सूत्रे हातात घेतली. दोघांनी पुढील अवघ्या 26 धावांमध्ये सात गडी बाद करत यजमान संघाचा डाव 114 धावांवर संपवला. कुलदीपने केवळ तीन षटके गोलंदाजी करताना सहा धावा देत चार जणांना तंबूचा रस्ता दाखवला. तर, जडेजाने सहा षटकात 37 धावा देऊन तिघांना बाद केले. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर, हार्दिक पांड्या व मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.
या धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने ईशान किशन व शुबमन गिल यांना मैदानात उतरवले. गिल केवळ 7 धावा करुन माघारी परतला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला बढती मिळाली. मात्र, तो 19 धावाच करु शकला. चौथ्या क्रमांकावर आलेला हार्दिक पंड्या चार धावा काढून दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. यादरम्यान ईशान किशन याने अर्धशतक साजरे केले. मात्र, त्यानंतर तो फार काळ टिकू शकला नाही. तसेच शार्दुल ठाकूर देखील लवकर बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने व रवींद्र जडेजाने भारताच्या विजयाची पूर्तता केली.
(India Beat West Indies In Barbados ODI By 5 Wickets Kuldeep Ishan Shines)
महत्त्वाच्या बातम्या-
संजूला बाकावर बसवल्याने उठले वादळ! चाहते म्हणतायेत, ‘मुंबई आणि उत्तर भारतीय लॉबी…’
“टीम इंडियाला रोहित-विराटची गरज नाही”, श्रीलंकेच्या दिग्गजाचे मोठे वक्तव्य