भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी मागील अनेक महिन्यांपासून क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. त्यामुळे आता तो आयपीएल २०२०मधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. तसेच आयपीएमार्गे तो भारतीय संघातही पुनरागमन करु शकतो अशी चर्चा होती.
पण कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता आयपीएल २०२० स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे आता धोनीच्या भारतीय संघातील पुनरागमनाबद्दल पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
याच विषयावर भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू वासिम जाफरने ट्विट करुन आपले मत मांडले आहे. त्याने ट्विट केले आहे की ‘जर धोनी तंदुरुस्त असेल आणि चांगल्या लयीत असेल तर त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करु नये. कारण तो यष्टीमागे सर्वोत्तम आहे आणि तो तळातील फलंदाजीमध्ये चांगले योगदान देऊ शकतो. त्यामुळे केएल राहुलवरील यष्टीरक्षण करण्याचा दबाव कमी होईल आणि भारतीय संघाला जर डावकरी फलंदाज हवा असेल तर पंतला केवळ फलंदाज म्हणून खेळवू शकतात.’
धोनीच्या अनुपस्थितीत मागील काही महिन्यांपासून केएल राहुल आणि रिषभ पंतने भारतीय संघाकडून यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे.
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात धोनीची निवड होणार की नाही हे पहावे लागणार आहे. कारण यापूर्वीच धोनीला विश्वचषक खेळायचा असेल तर आयपीएलमधून त्याला त्याचा फॉर्म सिद्ध करावा लागेल असे सांगण्यात आले होते. पण कोरोना व्हायरसमुळे सध्या आयपीएलच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह आहे.
ट्रेडिंग घडामोडी-
-कारकिर्दीत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात एकतरी झेल घेणाऱ्या खेळाडूचा आज आहे वाढदिवस
-आयपीएल २०२० आता होणार या महिन्यात?