कोलंबो। निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेत आज भारत विरुद्ध बांगलादेश संघात साखळी फेरीतील सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्के करण्याची संधी आहे.
सध्या भारतीय संघ दोन विजयांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्ध झालेल्या मागील दोन्ही साखळी सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवले आहेत. त्यामुळे भारतीय संघ आत्मविश्वासाने मैदानावर उतरेल.
भारताचे प्रभारी नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला मागील अनेक सामन्यांपासून मोठ्या धावा करण्यात अपयश येत आहे. या तिरंगी मालिकेतही त्याला अजून विशेष काही करता आलेले नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
या स्पर्धेत भारताच्या तरुण गोलंदाजांनी मात्र चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आत्तापर्यंत या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि विजय शंकर यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. भारताने विजय मिळवलेल्या दोन्ही सामन्यातही गोलंदाजच सामनावीराचे मानकरी ठरले आहेत.
पण याबरोबरच या तिरंगी टी २० मालिकेत सलामीवीर फलंदाज शिखर धवन, मनीष पांडेही चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. तसेच मागील श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलला संधी देण्यात आली होती. त्यामुळे या सामन्यातही त्याला ११ जणांच्या संघात स्थान मिळते का हे पाहावे लागेल.
बांग्लादेशलाही कमी लेखून चालणार नाही, कारण त्यांनी यजमान श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला आहे. त्यांनी श्रीलंकेने दिलेल्या २१५ धावांचे आव्हान सहज पार केले होते. त्यांच्या तमिम इक्बाल, लिटोन दास आणि मुश्तफिकूर रहीम या वरच्या फळीतील फलंदाजांनी या विजयात महत्वाची कामगिरी केली होती.
त्यामुळे बांग्लादेशही या तिरंगी मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल.
कुठे होईल भारत विरुद्ध बांग्लादेश टी २० सामना?
आज निदाहास ट्रॉफी स्पर्धेत भारत विरुद्ध बांग्लादेश संघात होणारा सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे. तिरंगी मालिकेतील(निदाहास ट्रॉफी) हा पाचवा सामना असणार आहे.
किती वाजता सुरु होणार भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील सामना?
आज भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याचे प्रसारण होईल?
भारत विरुद्ध बांग्लादेश संघात होणारा सामना चाहत्यांना डी स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स आणि रिश्ते सिनेप्लेक्स या चॅनेलवरून पाहता येणार आहे. डी स्पोर्ट्स चॅनेलवरून इंग्लिश समालोचन करण्यात येणार आहे. तर रिश्ते सिनेप्लेक्स चॅनेलवरून हिंदी समालोचन होईल.
हा सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आज होणाऱ्या भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील सामन्याचे ऑनलाईन प्रसारण जिओ टीव्ही लाईव्ह अॅपवर होणार आहे. या अॅपवर चाहत्यांना हा सामना ऑनलाईन पाहता येईल.
या सामन्यापुर्वी ट्रेंड झालेला टाॅप ट्विट:
Game… Train… Repeat!! #NidahasTrophy #Srilanka pic.twitter.com/gKVCn0BSRk
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 13, 2018
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ:
भारत: रोहीत शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), केएल राहूल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), दिपक हूडा, वाॅशीगंटन सुंदर, य़ुझवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दल ठाकूर, जयदेव उनाडकत, मोहंमद सीराज, रीषभ पंत (यष्टीरक्षक)
बांग्लादेश: महमुदूल्लाह रीयाद( कर्णधार), तमिम इक्बाल, सौम्या सरकार, इम्रूल कायेस, मुशफिकूर रहीम, नुरूल हसन सोहन, मेहेदी हसन मिराज, सब्बीर रहमान, मुस्तफिजूर रहमान, रूबेल हुसेन, अबू हैदर रोनी, अबू जायोद राही, अरूफुल हक आणि नाझमुल इस्लाम अपू