कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12व्या सामन्यात आमने-सामने आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा महामुकाबला रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारत विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. डेंग्यूमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकलेला सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याला इशान किशनच्या जागी संघात घेतले. दुसरीकडे, पाकिस्तान संघात कोणताही बदल झालेला नाहीये.
स्पर्धेतील कामगिरी
भारतीय संघाची स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर भारताने पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तान संघाला 8 विकेट्सने नमवले होते. दुसरीकडे, पाकिस्तान संघाविषयी बोलायचं झालं, तर पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सला 81 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाचा 6 विकेट्सने पराभव करण्यात पाकिस्तानला यश आले होते.
विश्वचषकात भारताविरुद्ध कधीच जिंकला नाही पाकिस्तान
विश्वचषक स्पर्धेतील उभय संघांची आमने-सामने आकडेवारी पाहायची झाली, तर दोन्ही संघ विश्वचषकात आतापर्यंत 7 वेळा आमने-सामने आले. मात्र, त्यातील सातही सामन्यात भारतच विजयी झाला आहे. अशात पाकिस्तान पहिला विजय मिळवण्याचा, तर भारत पाकिस्तानला 8व्यांदा नमवण्याचा प्रयत्न करेल. (India have won the toss and have opted to field against pakistan ind vs pak cwc 2023)
विश्वचषकातील 12व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तान
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ
हेही वाचा-
पाकिस्तानविरुद्ध भारताचा ‘हा’ गोलंदाज ठरेल गेमचेंजर; इंग्लंडच्या विश्वविजेत्या कर्णधाराला विश्वास
याला म्हणतात INDvsPAK सामन्याची क्रेझ! चाहत्यांनी स्टेडिअमबाहेर केली तुफान गर्दी, पाहा व्हिडिओ