---Advertisement---

हनुमा विहारीने सांगितले भारतीय फलंदाजांच्या बाद होण्याचे कारण; म्हणाला…

On: रविवार, मार्च 1, 2020 7:51 PM
---Advertisement---

शनिवारपासून (29 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा पहिला डाव 242 धावांवरच संपुष्टात आला. पहिल्या डावातील फलंदाजी गडगडण्यामागील कारण भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हनुमा विहारीने (Hanuma Vihari) स्पष्ट केले आहे.

विहारी यावेळी म्हणाला की, खराब फटकेबाजीच्या निवडीमुळे भारतीय संघाचा पहिला डाव 242 धावांवर संपुष्टात आला. खेळपट्टी इतकी खराब नव्हती.

या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताकडूून फलंदाजी करताना विहारीने 70 चेंडूत सर्वाधिक 55 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. यावेळी विहारीने सांगितले की, त्याला आक्रमक खेळी करायची होती. जेणेकरून चेतेश्वर पुजारा आपला नैसर्गिक खेळ करु शकेल.

“हो निश्चितच. कारण जशी आम्ही अपेक्षा केली होती, त्या तुलनेत खेळपट्टी एवढीही खराब नव्हती. त्यांनी (न्यूझीलंड गोलंदाज) योग्य लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजी केली. ही खेळपट्टी कशाप्रकारे प्रदर्शन करेल, हे त्यांना माहित होते,” असे विहारी म्हणाला.

“पृथ्वी शॉ लयीत खेळला, पुजाराने वेळ घेतला परंतु बाकीचे सर्व खेळाडू चूकीच्या वेळी बाद झाले. कोणताही खेळाडू खेळपट्टीमुळे बाद झाला नाही. काही खेळाडू आपल्या चूकांमुळे बाद झाले. खेळपट्टी व्यवस्थित होती,” असेही खेळपट्टीबद्दल बोलताना विहारी म्हणाला.

“पुजारा एका बाजूने खेळत होता आणि मला सकारात्मक खेळी करत डाव पुढे घेऊन जायचा होता. कारण तो असा खेळाडू आहे, जो लांब डाव खेळणारा खेळतो,” असेही विहारी यावेळी म्हणाला.

आपल्या रणनीतीबद्दल बोलताना विहारी म्हणाला की, “मलाही जास्त वेळ घ्यायचा नव्हता. त्यामुळे पुजारा आणि आमच्या डावावर दबाव वाढला नसता. कारण जर तुम्ही धावसंख्येत वाढ केली नसती, तर मागील सामन्याप्रमाणे एकाच जागी थांबावे लागले असते. तेव्हा मी सकारात्मक खेळी करत डाव पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.”

या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार प्रदर्शनामुळे न्यूझीलंडचा डाव 235 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे भारताने 7 धावांची आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या डावात पुन्हा एकदा भारताची फलंदाजी कोलमडली. भारताने दुसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 6 बाद 90 धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---