अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात अॅडलेड ओव्हल मैदानात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 61 षटकात 3 बाद 151 धावा केल्या असून 166 धावांची आघाडी घेतली आहे.
तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पावसाचा अनेकदा व्यत्यय आला होता. मात्र दुसऱ्या सत्रानंतर सामना सुरळीत सुरु झाला.
या सामन्यात भारताने आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिल्या सत्रातच 235 धावांवर संपुष्टात आणला आहे. त्यामुळे भारताने 15 धावांची आघाडी घेतली होती.
दुसऱ्या सत्रात भारताकडून दुसऱ्या डावाची केएल राहुल आणि मुरली विजय यांनी सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला चांगला खेळ केला होता.
पण चांगल्या सुरुवातीनंतरही मुरली 18 धावांवर बाद झाला. त्याला मिशेल स्टार्कने बाद केले. त्यानंतर काही वेळातच राहुललाही जोश हेजलवूडने 44 धावांवर बाद केले आहे. त्यामुळे भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी पुन्हा चेतेश्वर पुजारावर आली.
पुजारानेही कर्णधार विराट कोहलीच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. पण ही भागीदारी रंगत असताना आॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियानने कोहलीला 34 धावांवर असताना बाद केले. कोहलीचा झेल शॉर्टलेगला उभ्या असणाऱ्या अॅरॉन फिंचने घेतला.
त्यामुळे आता तिसऱ्या दिवसाखेर पुजारा 40 आणि अजिंक्य रहाणे 1 धावेवर नाबाद आहेत.
तत्पुर्वी आॅस्ट्रेलियाने पावसाच्या व्यत्ययाने उशिरा सुरुवात झालेल्या तिसऱ्या डावाला 7 बाद 191 धावांपासून खेळायला सुरुवात केली. पण लगेचच बुमराहने दिवसाच्या तिसऱ्या षटकात मिशेल स्टार्कला 15 धावांवर बाद केले. पण पुन्हा त्यानंतर पावसाला सुरुवात झाली.
त्यानंतर साधारण तासाभराने पुन्हा सामना सुरु झाला. यानंतर काहीवेळातच मोहम्मद शमीने एकाकी झुंज देणाऱ्या ट्रेविस हेडला 99 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर शमीने जोश हेझलवूडला बाद करत आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव 98.4 षटकात 235 धावांवर संपुष्टात आणला.
हेडने आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सर्वाधिक धावा केल्या. त्याने 167 चेंडूत 72 धावा करताना 6 चौकार मारले. पण शमीने शॉर्टलेन्थवर टाकलेल्या चेंडूवर हेडचा फटका चुकल्याने चेंडू सरळ यष्टीरक्षक पंचच्या हातात गेला.
भारताकडून या डावात जसप्रीत बुमराह(3/47), आर अश्विन(3/57), इशांत शर्मा(2/47) आणि मोहम्मद शमी(2/58) यांनी विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक-
भारत पहिला डाव – सर्वबाद 250 धावा
आॅस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद 235 धावा
भारत दुसरा डाव – 3 बाद 151 धावा
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहलीची कसोटीमध्ये या गोलंदाजाने केली आहे सर्वाधिक वेळा शिकार
–असा पराक्रम करणारा कोहली ठरला केवळ चौथा भारतीय
–भारताच्या या बॅडमिंटनपटूचे मतदार यादीतून नाव झाले गायब
–होय! कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात गंभीरची चमकदार कामगिरी