रविवारी (२४ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, पाकिस्तान संघाने आधी शानदार गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजी करून भारतीय संघावर १० गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारताचे पाकिस्तानवर विश्वचषकात असलेले वर्चस्व समाप्त झाले. तब्बल २९ वर्ष भारताने पाकिस्तानवर विश्वचषकात मात केली होती. या पराभवासह भारताचा कर्णधार विराट कोहली पाकिस्तानकडून पराभूत होणारा पहिला कर्णधार बनला. आज आपण भारताच्या सर्व विजयांबाबत जाणून घेणार आहोत.
१) मोहम्मद अजहरूद्दीन-
भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांची विश्वचषकात पहिली गाठ १९९२ विश्वचषकात पडली. या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय साजरा केला होता. या सामन्यात पाकिस्तानच्या जावेद मियादादने मारलेल्या माकड उड्या क्रिकेटप्रेमींच्या नेहमी लक्षात राहतील.
यानंतर चार वर्षांनंतर १९९६ वनडे विश्वचषकात बेंगलोर येथील सामन्यात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानावर सरशी साधली. या सामन्यातील आमीर सोहेल व व्यंकटेश प्रसाद यांच्यातील वाद आजही दोन्ही देशांतील चाहत्यांसाठी वेगळी पर्वणी आहे. या विजयानंतर भारतीयांना पुन्हा एकदा जल्लोष साजरा करण्याची संधी १९९९ विश्वचषकात मिळाली. पुन्हा एकदा व्यंकटेश प्रसाद व राहुल द्रविड यांनी मोलाचे योगदान देत भारताला सलग तिसरा विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे या तीनही वेळी भारताचा कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिन हाच होता.
२) सौरव गांगुली-
एकविसाव्या शतकातील महिला विश्वचषक २००२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला. सेंच्युरीअन येथील या सामन्यात भारतीय संघाने सचिन तेंडुलकरच्या अविश्वसनीय अशा ९८ धावांच्या खेळीच्या जोरावर ३०० पेक्षा जास्त धावांचे आव्हान लीलया पार केले. या सामन्यात सचिनने शोएब अख्तरला लगावलेला अपर कट डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व सौरव गांगुली याने केले होते.
३) एमएस धोनी-
पाकिस्तान विरुद्ध विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार म्हणून एमएस धोनीकडे पहिले जाते. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ टी२० विश्वचषकात दोन वेळा, २०१२, २०१४ व २०१६ टी२० विश्वचषकात प्रत्येकी एकदा असे पाच वेळा पाकिस्तानला पराभूत केले. याखेरीज, २०११ वनडे विश्वचषकात व २०१५ वनडे विश्वचषक भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चित केलेले.
४) विराट कोहली-
विराट कोहली याने २०१९ वनडे विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व केलेले. मॅंचेस्टर येथील या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला होता. यासह भारताने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील एकूण विजयांमध्ये १२-० अशी आघाडी घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
याला म्हणतात आदर! इतिहास रचल्यानंतर हात बांधून मेन्टॉर धोनीपुढे उभे राहिले पाकिस्तानचे खेळाडू- VIDEO
भारतावर पाकिस्तानचा ‘रिकॉर्डब्रेक’ विजय, क्रिकेटविश्वातील सुरमा संघांनाही न जमलेला केला पराक्रम