अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात मंगळवारी (१६ मार्च) तिसरा टी२० सामना पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताला ८ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. या सामन्यात भारताने इंग्लंडला १५७ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंग्लंडने जोस बटलरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १८.२ षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात यशस्वीरित्या सहज पार केले.
साल २०१९ पासून टी२० क्रिकेटमध्ये मायदेशात प्रथम फलंदाजी करताना २०० पेक्षा कमी धावा केल्यानंतर पराभव स्विकारण्याची भारतीय संघाची ही ७ वी वेळ होती. अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र आकडेवारी असेच सांगते.
भारतीय क्रिकेट संघाने १ जानेवारी २०१९ पासून भारतात आत्तापर्यंत १६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यातील १० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली आहे. या १० सामन्यांपैकी ३ सामने भारताने जिंकले आहेत, तर ७ सामने पराभूत झाले आहेत.
विशेष म्हणजे जिंकलेल्या ३ सामन्यांपैकी २ सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. तर १ सामन्यात २०० पेक्षा कमी धावा केल्या होत्या. त्याचबरोबर भारताने पराभूत झालेल्या सर्व ७ सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २०० पेक्षा कमी धावा केल्या होत्या. या आकडेवारीवरुन लक्षात येते की भारतात गेल्या २ वर्षात प्रथम फलंदाजी करताना भारताने जर २०० धावांचा टप्पा ओलांडला नाही तर पराभव जवळपास पक्का होत आहे.
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात पराभव
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. यावेळी पहिल्या तीन विकेट्स ६ षटकांच्या आतच गेल्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी अशी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्याने पहिल्यांदा रिषभ पंत (२५)बरोबर ४० आणि नंतर हार्दिक पंड्यासह(१७) ७० धावांची भागीदारी रचली. तसेच यादरम्यान विराटने ४६ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७७ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला २० षटकात ६ बाद १५६ धावा करता आल्या.
प्रतिउत्तरादाखल १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने जेसन रॉयची(९) विकेट चौथ्याच षटकात गमावली होती. मात्र त्यानंतर जोस बटलरने पहिल्यांदा डेव्हिड मलानला(१८) साथीला घेतले. त्याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर नाबाद ७७ धावांची भागीदारी जॉनी बेअरस्टो(४०*) बरोबर करत इंग्लंडला १९ व्या षटकात विजय मिळवून दिला. यावेळी बटलरने ५२ चेंडूत नाबाद ८३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिमानास्पद! ‘ही’ महिला क्रिकेटपटू देणार पुरुष संघाला क्रिकेटचे धडे
ऍस्टलचे ‘ते’ तडाखेबंद द्विशतक आठवतय का? १९ वर्षापासून कोणीही मोडू शकला नाही तो विक्रम
अझरुद्दीनचा ‘सुपरमॅन’ अवतार, चित्त्याच्या चपळाईने केला रनआउट, पाहा व्हिडिओ