भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर डूब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत फेरबदल पाहायला मिळाले आहेत. WTC म्हणजेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा 2023-25 हंगाम सध्या सुरू आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका देखील याच मालिकेचा भाग आहे. सोमवारी (5 फेब्रुवारी) विशाखापट्टणम कसोटीत 106 धावांनी विजय मिळवल्यानंतर भारताने कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. त्याचसोबत डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही मोठी झेप घेतली.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत भारताची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली होती. पण विशाखापट्टणम कसोटी जिंकत भारताने पुन्हा झेप घेतली आहे. सुधारीत गुणतालिकेत भारतीय संघ 52.77 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशाखापट्टणम कसोटीआधी भारतीय संघ 43.33 गुणांसह पाचव्या क्रमांकावर होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यातर भारताने विजय मिळवला, तर गुणतालिकेत संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकतो. पुढचा सामना भारताला 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळायचा आहे.
दुसरीकडे सोमवारी पराभव मिळालेल्या इंग्लंडचा विचार केला, तर इंग्लंड संघ डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचे गुणतालिकेत स्थान घसरले नाहीये. पण संघाकडे असलेले गुण आता 25 पर्यंत खाली घसरले आहेत. इंग्लंडनंतर श्रीलंकन संघ 9व्या क्रमांकावर आहे. डब्ल्यूटीसीचा गतविजेता ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाकडे 55 गुण आहेत. पुढच्या सामन्यांतर गुणतालिकेत पहिला क्रमांक गाठण्यासाठी भारतासह न्यूझीलंड देखील दावेदार आहे.
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या दोन दिवसांचा खेळ पाहता यजमान न्यूझीलंड संघ सामन्यात भक्कम स्थानी आहे. जर न्यूझीलंडने हा सामना जिंकला, तर भारत आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकून संघ पहिल्या स्थानावर पोहोचू शकतो. सध्या न्यूझीलंडच्या खात्यात 50 गुण आहेत. एक विजय मिळवल्यानंतर त्यांच्या नावावर 12 गुण अजून जोडले जातील.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । विजयानंतर भारत फूल कॅन्फिडेंसमध्ये! तिसऱ्या कसोटीआधी रोहितचे मोठे विधान
IND vs ENG । इंग्लंडच्या पराभवानंतर यॉर्करबाबत बोलला बुमराह, रोहित शर्माचाही केला उल्लेख