नुकताच आयपीएलचा १३ वा हंगाम पार पडला. या हंगामात मुंबई इंडियन्सने विजय मिळवत पाचवे विजेतेपद पटकावले. या हंगामात मुंबईकडून धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने लक्षवेधी कामगिरी केली. यादरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय वनडे, टी२० आणि कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, सूर्यकुमारला संधी मिळाली नाही. त्यानंतर आता वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज कर्णधार ब्रायन लाराने सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात सामील केले पाहिजे होते, असे म्हटले आहे. यासोबतच सूर्यकुमारची प्रशंसाही केली आहे.
‘तो एक शानदार खेळाडू’
“होय. नक्कीच, तो एक शानदार खेळाडू आहे. मी केवळ खेळाडूंना धावा करताना पाहत नाही. मी त्यांचे खेळण्याचे तंत्र, दबावात खेळण्याची त्यांची क्षमता यांवर लक्ष देतो. याव्यतिरिक्त ते कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करतात यावरही मी लक्ष देतो. सूर्यकुमार यादवने मुंबई संघाकडून चांगली कामगिरी केली. तो रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकनंतर फलंदाजीला येतो,” असे सूर्यकुमारबद्दल बोलताना लाराने म्हटले.
“तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज संघाचा सर्वोत्तम आणि विश्वासू फलंदाज असतो. माझ्या हिशोबाने तो मुंबईसाठी अशाच प्रकारचा खेळाडू राहिला आहे. अशामध्ये मला वाटते की त्याला भारतीय संघात स्थान मिळाले पाहिजे,” असेही सूर्यकुमारची प्रशंसा करताना लाराने म्हटले.
आयपीएलमध्ये सूर्यकुमारने मुंबईकडून १६ सामने खेळले. त्यात त्याने ४० च्या सरासरीने आणि १४५.०१ च्या स्ट्राईक रेटने ४८० धावा केल्या आहेत. यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ७७ प्रथम श्रेणी सामने, ९३ अ दर्जाचे सामने आणि १६५ देशांतर्गत टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने प्रथम श्रेणीत ५३२६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १४ शतके ठोकली आहेत. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये २ शतकांच्या मदतीने २४४७ धावा केल्या आहेत. टी२०त ३४९२ धावा केल्या आहेत.
सध्या भारतीय संघ सिडनी येथे सराव करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चर्चा तर होणारंच! विराट कोहलीला ट्रोल करणारं ट्वीट सूर्यकुमार यादवकडून लाईक
“सूर्यकुमार यादव होईल मुंबई इंडियन्सचा पुढील कर्णधार”, पाहा कोणी केलीय भविष्यवाणी
सूर्यकुमार यादवच्या ‘या’ पराक्रमाने तरी निवड समितीचे डोळे उघडतील का?