भारताचा मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत. या दौऱ्याला १३ जुलैपासून वनडे सामन्याने सुरुवात होणार होती. मात्र, आता वनडे आणि टी२० मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यावरुन आल्यानंतर श्रीलंका संघाचा फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर आणि डेटा ऍनॅलिस्ट कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने या मर्यादित षटकांच्या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
त्यामुळे आता १३ जुलैपासून सुरु होणारी वनडे मालिका १७ जुलैला सुरू होणार आहे. तर २१ जुलै रोजी तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळवला जाणार आहे. तसेच टी२० मालिका २४ ते २७ जुलै दरम्यान होणार आहे. हे सर्व सामने कोलंबो येथे होणार आहेत. यामुळे श्रीलंकेचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यानंतर कोरोना पॉझिटिव्हची प्रकरणे समोर आल्याने वाढवण्यात आलेला क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करु शकतील.
यापूर्वी वनडे मालिका १३ ते १८ जुलैदरम्यान, तर टी२० मालिका २१ ते २५ जुलैदरम्यान होणार होती.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मालिकेच्या नव्या वेळपत्रकाची पुष्टी केली आहे. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की, “हो. श्रीलंका-भारत मालिका आता १३ जुलै ऐवजी १७ जुलैपासून सुरू होणार आहे. हा निर्णय खेळाडूंच्या सुरक्षिततेला लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने चर्चा करुन एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.”
या मालिकांसाठी श्रीलंकेने अजून संघ घोषित केलेला नाही. पण, भारताचा संघ घोषित झाला असून सध्या श्रीलंकेत आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. तसेच भारतीय खेळाडू दोन संघ बनवून आपापसांत इंट्रास्क्वॉड सराव सामनेही खेळत आहेत. तर सध्या श्रीलंकेचे खेळाडू कोलंबोमधील हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. या सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती श्रीलंका बोर्डाच्या सूत्रांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडकडून खेळणाऱ्या ‘या’ पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाने मोडले पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे
श्रीलंका दौऱ्यात युजवेंद्र चहलची अग्निपरिक्षा; पाहा या दौऱ्याबद्दल काय म्हणाला भारतीय फिरकीपटू
“राहुल द्रविडने भारताचा पूर्णवेळ प्रशिक्षक होऊ नये”, दिग्गज भारतीय क्रिकेटरचे मत