भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात रवींद्र जडेजाला झालेल्या दुखापतीमुळे ‘कन्कशन सब्स्टीट्युट’ म्हणून फिरकीपटू युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली होती.मात्र, या निर्णयामुळे चांगलेच वादळ निर्माण झाले होते. क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या या निर्णयावर टीका केली होती. आता भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने या निर्णयाचे समर्थन केले आहे.
चहलने भारताच्या विजयात निभावली मोलाची कामगीरी
युजवेंद्र चहलने चार षटकांत 25 धावा देऊन तीन गडी बाद केले आणि सामनावीर ठरला. त्याने ऍरॉन फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड या फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. त्याने भारताच्या विजयात मोलाची कामगीरी बजावली. त्यामुळे कन्कशन सब्स्टीट्युट म्हणून चहलची निवड करणे भारताच्या दृष्टीने योग्य निर्णय होता.
…तेव्हा दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यासाठी अधिक वेळ लागला नसता
अनिल कुंबळे म्हणाला की, “ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू फिल ह्युज याच्या निधनानंतर गेल्या काही वर्षांपासून हा नियम लागू होता. जेव्हा एखाद्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत होते तेव्हा त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संघात स्थान दिले जाते. मला माहित आहे की डोक्याला दुखापत होण्याआधी जडेजाला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला होता. पण जेव्हा तो जखमी झाला, तेव्हा त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यासाठी अधिक वेळ लागला नसता.”
फिजिओला बोलावणे पंचावर अवलंबून
जडेजाला दुखापत झाल्यावर फिजिओला मैदानात बोलावण्यात आले नव्हते. याबद्दल बोलताना कुंबळे म्हणाला की, “फिजिओला मैदानात बोलावण्याचा निर्णय जडेजावर अवलंबून होता,असे मला वाटत नाही. खेळ थांबवून फिजिओला बोलावणे हे पंचांवर अवलंबून असते. हे बहुधा घडले नाही, कारण जडेजाने लगेच एकेरी धाव घेतली तो खेळायला लागला.”
खेळाडू ड्रेसिंग रूममध्येही परत जाऊ शकतो
“कन्कशनसाठी खेळाडूला मैदानातच थांबणे आवश्यक नाही. आपण ड्रेसिंग रूममध्ये परत जाऊ शकता आणि नंतर आपल्याला डोकेदुखी किंवा चक्कर आल्यास डॉक्टर तपासणी करेल. मात्र, या बाबतीत असं घडलं नाही,”असेही पुढे बोलताना कुंबळे म्हणाला.
..तर चहलला संधी देण्यात आली नसती
सब्स्टीट्युट म्हणून जशास-तसा खेळाडूला स्थान देण्याबाबत कुंबळे म्हणाला की, “जडेजाने फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिले होते आणि तो एक फिरकीपटू आहे, त्यामुळे बदली म्हणून जशास तसा फिरकीपटू युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली. जर भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत असता आणि जडेजाला दुखापत झाली असती, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी सब्स्टीट्युट खेळाडू म्हणून चहलला संधी देण्यात आली असती, असे मला वाटत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या टी२० सामन्यासाठी असे असू शकतात भारत-ऑस्ट्रेलिया ११ जणांचे संघ
भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामना : शुभमन गिल-पृथ्वी शॉ शुन्यावर बाद, तर रहाणे आणि पुजारा….
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
भारताच्या ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस