भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज (29 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात भारताला 51 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 389 धावा केल्या आणि भारताला 390 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 षटकात 9 बाद 338 धावाच करता आल्या.
भारताला शेवटच्या 9 षटकात 130 धावांची गरज होती. मात्र यानंतर केएल राहुल 43 व्या षटकात 66 चेंडूत 76 धावांची खेळी करुन बाद झाला. त्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यापाठोपाठ आक्रमक खेळणारा रविंद्र जडेजा 11 चेंडूत 24 धावा करुन बाद झाला. त्याला पॅट कमिन्सने 47 व्या षटकात बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर हार्दिक पंड्याही 28 धावांवर बाद झाला.
यानंतरही भारताचे तळातील फलंदाज तग धरु शकले नाहीत. मोहम्मद शमी 1, जसप्रीत बुमराह 0 आणि करुन बाद झाले. नवदीप सैनी 10 आणि चहल 4 धावांवर नाबाद राहिले.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जोश हेजलवूड आणि ऍडम झम्पाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोझेस हेन्रीक्स आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
केएल राहुलचे अर्धशतक –
विराट बाद झाल्यानंतर केएल राहुलने भारताच्या फलंदाजीची जबाबदारी स्विकारली. त्याला 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पंड्याने चांगली साथ दिली.
राहुलने 39 व्या षटकात पॅट कमिन्सच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे 8 वे वनडे अर्धशतक ठरले.
राहुल आणि पंड्या ज्याप्रकारे भारताचा डाव पुढे नेत आहेत, त्यावरुन भारताच्या विजयाच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. या दोघांनी मी 41 षटकापर्यंत भारताला 260 धावांचा टप्पा गाठून दिला आहे.
अजून भारताला शेवटच्या 9 षटकात 130 धावांची गरज आहे.
विराटचे हुकले शतक
या सामन्यात श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर विराट आणि केएल राहुलने भारताचा डाव पुढे नेला होता. या दोघांनी चांगली फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. पण मागील भागीदाऱ्याप्रमाणेच ही भागीदारी रंगत असतानाच हेझलवूडने विराटला बाद केले. विराट 87 चेंडूत 89 धावा करुन बाद झाला. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. विराटचा झेल मोझेस हेन्रीक्सने घेतला.
विराट बाद झाल्यानंतर केएल राहुलसह हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी आला आहे. राहुलने 3 चौकारांसह 30 धावांचा टप्पा पार केला आहे.
भारताने या सामन्यात 35 षटकात 4 बाद 225 धावा केल्या आहेत.
विराट-अय्यरची शानदार भागीदारी –
विराट 8 व्या षटकात फलंदाजीसाठी आला होता. यावेळी त्याने काही आक्रमक फटके खेळले. त्याने भारताचा डाव श्रेयस अय्यरसह पुढे नेला. विराटने 23 व्या षटकात 53 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे 59 वे वनडे अर्धशतक आहे.
विराट आणि श्रेयस यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी झाली. मात्र श्रेयस 36 चेंडूत 38 धावा करुन बाद झाला. त्याला मोझेस हेन्रीक्सने बाद केले.
भारताने 23 षटकात 3 बाद 153 धावा केल्या आहेत.
शिखर – मयंकची अर्धशतकी भागीदारी –
ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 390 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर आणि मयंक यांनी 7 षटकात अर्धशतकी भागीदारी केली.
या चांगल्या सुरुवातीनंतरही शिखर आठव्या षटकात जॉस हेझलवूडच्या गोलंदाजीवर 30 धावा करुन बाद झाला. त्याचा झेल मिशेल स्टार्कने घेतला. तर मयंक 28 धावांवर 9 व्या षटकात बाद झाला. त्याला पॅट कमिन्सने बाद केले.
भारताने 9 षटकात या दोन विकेट्स गमावून 61 धावा केल्या आहेत.
तत्पूर्वी डेविड वॉर्नर दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला आहे.
भारताला दिले 390 धावांचे आव्हान –
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या पाचही फलंदाजांनी 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. डेविड वॉर्नर(83), ऍरॉन फिंच (60), स्टिव्ह स्मिथ (104), मार्नस लॅब्यूशेन(70) आणि ग्नेन मॅक्सवेल(63*) यांनी 50 पेक्षा अधिक धावांचे योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजी करताना हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
लॅबूशेन, मॅक्सवेलचा अर्धशतकी तडाखा –
42 व्या षटकांत हार्दिक पंड्याने स्मिथला मोहम्मद शमीकरवी झेलबाद केले. स्मिथ बाद झाला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 बाद 292 होती. स्मिथ तंबूत परतल्यावर आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी करायला आला.
युवा फलंदाज मार्नस लाबूशेनने संघाच्या फलंदाजीची पुढील जवाबदारी स्वीकारली. आपल्या खेळीत कोणतीही जोखीम न घेता त्याने कारकिर्दीतील दुसरे वनडे अर्धशतक पूर्ण केले.
दुसऱ्या टोकाला मॅक्सवेलने फटकेबाजी सुरूच ठेवली. 48 व्या षटकांत त्याने मोहम्मद शमीच्या दोन चेंडूवर सलग दोन षटकार ठोकले. मार्नस लाबूशेननेही त्याला उत्तम साथ दिली. लाबूशेन 61 चेंडूत 70 धावा करून तंबूत परतला. 49 व्या षटकांत बुमराहने त्याला झेलबाद केले.
लाबूशेन-मॅक्सवेल जोडीने चौथ्या विकेटसाठी 80 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. मॅक्सवेलने तुफानी खेळी करत अवघ्या 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
डावाच्या अखेरच्या षटकात वेगवान गोलंदाज नवदीप सैनी गोलंदाजी करायला आला. मॅक्सवेलने या षटकांत दोन चेंडूवर सलग दोन षटकार ठोकले. अखेरच्या षटकांत मॅक्सवेलने केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 389 धावा केल्या.
मॅक्सवेल 29 चेंडूत 63 धावा करून नाबाद राहिला.
सलग दुसऱ्या वनडेत स्मिथचे शतक –
या सामन्यात 36 व्या षटकांत षटकांत अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गोलंदाजीसाठी आला. सप्टेंबर 2019 नंतर त्याने पहिल्यांदा गोलंदाजी केली. त्यामुळे दुखापतीमुळे तो गोलंदाजी करण्यास तंदुरुस्त नाही, या चर्चेला त्याने पूर्णविराम दिला.
पण असे असले तरी स्मिथने आक्रमक शैलीत फटकेबाजी सुरूच ठेवली. 40 व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या बुमराहच्या षटकांत स्मिथने दोन चेंडूवर सलग दोन चौकार ठोकले. पाचव्या चेंडूवर स्वेअर लेगच्या दिशेने त्याने पुन्हा एक चौकार ठोकला. या षटकात त्याने तब्बल 13 धावा कुटल्या.
41 व्या षटकात फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने लांबलचक षटकार ठोकला. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने शतक पूर्ण केले.
या वनडे मालिकेतील हे त्याचे सलग दुसरे शतक आहे. 41 षटकात ऑस्ट्रेलियाने 3 बाद 292 धावा केल्या आहेत.
अय्यरने केले वॉर्नरला धावबाद –
डावाच्या 23 व्या षटकांत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गोलंदाजीसाठी आला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर कर्णधार ऍरॉन फिंचने एक्सट्रा कव्हर वरून फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्णधार विराट कोहलीने त्याचा झेल घेतला. फिंच 60 धावा करून तंबूत परतला.
फिंच बाद होताच अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ फलंदाजीसाठी आला. ऑस्ट्रेलियाने 25 षटकांत 150 धावांचा टप्पा पार केला.
26 व्या षटकांत फिरकीपटू रवींद्र जडेजा गोलंदाजी करायला आला. षटकाच्या 3 ऱ्या चेंडूवर डेविड वॉर्नरने लॉन्ग ऑफच्या दिशेने फटका मारला. त्याने एक धाव घेतली. दुसरी धाव पूर्ण करण्याचा त्याने प्रयत्न केला, मात्र श्रेयस अय्यरने अचूक थ्रो फेकत वॉर्नरला धावबाद केले. वॉर्नर 77 चेंडूत 83 धावा करून तंबूत परतला. वॉर्नर बाद झाला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 156 धावा होती.
युवा खेळाडू मार्नस लाबूशेन 4 थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. संयमी खेळ करत त्याने स्टीव्ह स्मिथसह डाव पुढे नेला. स्मिथने आक्रमक शैलीत फलंदाजी करत अवघ्या 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाने 35 षटकांत 6.57 च्या धावगतीने 2 बाद 230 धावा केल्या.
फिंच-वॉर्नरची शतकी भागीदारी
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज डेविड वॉर्नर आणि कर्णधार ऍरॉन फिंच हे सलामीला आले. या दोघांनीही संयमीपणे डावाची सुरुवात केली. सुरुवातीच्या काही षटकांत संथ गतीने धावा केल्यानंतर डेविड वॉर्नरने त्याच्या आक्रमक शैलीत फटके मारले. त्यामुळे पहिल्या 10 षटकांत या संघाने प्रति षटकांत 5.90 ची धावगती राखत एकही गडी न गमावता 59 धावा केल्या.
भारताचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी पहिल्या काही षटकात महागडा ठरला. त्याच्या पहिल्या 3 षटकांत ऑस्ट्रेलियाने तब्बल 28 धावा कुटल्या.
डावाच्या 11 व्या षटकांत गोलंदाजीसाठी आलेला फिरकीपटू युझवेंद्र चाहलच्या दुसऱ्याच चेंडूवर वॉर्नरने षटकार ठोकला. त्यानंतर त्याने चौकार ठोकला आणि चौथ्या चेंडूवर एक धाव घेऊन वॉर्नरने 40 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
वॉर्नर आक्रमक शैलीत फलंदाजी करत असताना दुसऱ्या टोकाला ऍरॉन फिंचने संयमी खेळी सुरुच ठेवली. डावाच्या 16 व्या षटकांत फिरकीपटू रवींद्र जडेजा गोलंदाजीसाठी आला. या षटकांत एकेरी-दुहेरी धावा घेत या दोनही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 100 च्या पार नेली.
ऑस्ट्रेलियाने 16 षटकांत बिनबाद 101 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघात झालेले बदल : भारतीय संघ पहिल्या वनडे सामन्यातील प्लेयिंग इलेव्हनसह या सामन्यात उतरेल.
ऑस्ट्रेलिया संघात झालेले बदल : स्टोइनिसच्या जागी मोईझेस हेन्रीक्सला ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचे प्लेयिंग एलेव्हन : डेविड वॉर्नर, ऍरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, मोईझेस हेन्रीक्स, ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेजलवुड आणि अॅडम झाम्पा
भारतीय संघाचे प्लेयिंग इलेव्हन : मयंक अगरवाल, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, यूझवेंद्र चहल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह
पहिल्या सामन्यात भारताचा पराभव
शुक्रवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा 66 धावांनी दारुण पराभव झाला होता. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधायची असेल, तर भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्यात मालिका खिशात खालण्याच्या हेतूनेच उतरेल.
पहिल्या वनडेत भारतीय संघाला काही चुका भोवल्या. सुमार क्षेत्ररक्षण, वरच्या फळीतील फलंदाजांना आलेलं अपयश या कारणांमुळे भारतीय संघ संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखू शकला नाही. भारतीय गोलंदाजांनाही योग्य वेळी गडी बाद करण्यात अपयश आले. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवायचा असेल, तर भारताला तीनही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.
पहिल्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि मयंक अगरवाल लवकर माघारी परतल्यावरही भारतीय संघाने 308 धावा केल्या. ही भारतीय संघासाठी चांगली बाब आहे.त्यामुळे जर दुसऱ्या वनडे सामन्यात विराट, केएल राहुल अधिक जवाबदारी घेऊन खेळले, तर भारताचा निश्चितच विजय होईल.