भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने ८ विकेट्सने शानदार विजय मिळवला. याबरोबर कसोटी मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व अजिंक्य रहाणेने केले होते. याच सामन्यात त्याला अफलातून कामगिरीबद्दल खास मेडल देण्यात आले.
या सामन्यात सामनावीर ठरलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात ११२ तर दुसऱ्या डावात नाबाद २७ धावांची खेळी केली. यामुळे ओघानेच रहाणे सामनावीर ठरला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपुर्वीच बॉक्सिंग डे कसोटीत सामनावीर ठरलेल्या खेळाडूला खास मेडल देण्याचा निर्णय घेतला होता. हे मेडल अर्थातच जॉनी मुलाघ मेडल होय. जॉनी मुलाघ हे ऑस्ट्रेलियाने केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात संघाचे कर्णधार होते. आता त्यांच्याच सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे.
जॉनी मुलाघ यांच्याबद्दल थोडक्यात-
युके दौऱ्यात खेळलेल्या मुलाघ यांनी ४५ सामन्यांत ७१ डावांत १९६८ धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजीत १८७७ षटकं टाकताना तब्बल ८३१ षटकं निर्धाव टाकण्याचा कारनामा केला होता. यात त्यांनी २५७ विकेट्सही घेतल्या होत्या. यष्टीरक्षण करताना त्यांनी ४ यष्टीचीत केले होते. १८६६ साली ते बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळले होते. याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत दिली आहे.
रहाणेची कसोटीतील कामगिरी-
अजिंक्य रहाणेने कसोटी कारकिर्दीत ६७ सामन्यांत ४३.८४ च्या सरासरीने ४३८४ धावा केल्या आहेत. त्यात त्याने १२ शतके केली आहेत. या १२ शतकांपैकी भारतीय संघ ९ वेळा विजयी झाला असून केवळ ३ वेळा सामने अनिर्णित राहिले आहेत. रहाणेने शतक केल्यानंतर भारतीय संघ कधीही पराभूत झाला नाही. तसेच त्याने भारतीय कसोटी संघाचे ३ सामन्यात नेतृत्त्व केले असून त्यात भारतीय संघाने तिनही वेळा विजय मिळवला आहे.