मागील २ वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने इतिहास रचला होता. विराटने असा कारनामा केला होता, जो मोठ-मोठ्या धुरंधर कर्णधारांना मागील ७१ वर्षांमध्ये करता आला नव्हता. त्याच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजय मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास सज्ज आहे. परंतु पुन्हा एकदा भारताला ही कामगिरी बजावता येईल का?, यावर भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांनी ऑस्ट्रेलियामध्ये जिंकण्याची पूर्ण योजना सांगितली आहे. एका वेबिनारमध्ये दोघांनीही आपापली मते मांडली.
काय आहे अनिल कुंबळेची योजना?
माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या मते, मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत पहिला कसोटी सामना जिंकावा लागेल. तो म्हणाला, “भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेची सुरुवात गुलाबी चेंडूने होणार आहे. हे भारतासाठी सर्वात मोठे आव्हान आहे. जर भारतीय संघाने पहिल्या कसोटीत आघाडी घेतली, तर ते पुन्हा एकदा मागील दौऱ्याच्या यशाची पुनरावृत्ती होऊ शकते. तरीही, यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. मागील दौऱ्यात चेंडू छेडछाडीमुळे बंदी घातलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरचे संघात पुनरागमन झाले आहे, तर विराट कोहली उर्वरित ३ कसोटी सामन्यात नसणार आहे. परंतु तरीही भारताकडे कसोटी मालिका जिंकण्याची क्षमता आहे.”
राहुल द्रविडनेही मांडले आपले मत?
दुसरीकडे मात्र, ‘द वॉल’ या नावाने ओळखला जाणारा राहुल द्रविडने आपले मत मांडताना म्हटले की, संघाच्या इतर फलंदाजांना चेतेश्वर पुजाराप्रमाणे धावा कराव्या लागतील. तो म्हणाला, “मागच्याप्रमाणे यावेळी आमचा पुजारा कोण असेल? मी असे यासाठी म्हणत आहे, कारण की मागील दौऱ्यात पुजाराने ५०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे पुजारा किंवा इतर कोणत्याही फलंदाजाला धावा कराव्या लागतील. निश्चितच हे काम विराट कोहली करू शकत नाही. कारण तो पूर्ण दौऱ्याचा भाग नाही. परंतु माझ्या मते, तुम्हाला एक असा फलंदाज पाहिजे जो चार कसोटी सामन्यात ५०० धावा करतील. मला पूर्ण विश्वास आहे की, आपल्याकडे एक असे गोलंदाजी आक्रमण आहे, जे ऑस्ट्रेलियामध्ये २० विकेट्स घेऊ शकते.”
काय आहे ऍडलेड मैदानाचा इतिहास?
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे खेळला जाईल. या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाचा दबदबा राहिला आहे. इथे खेळले २० पैकी १४ सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला आहे, तर केवळ ३ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे या मैदानावर खेळण्यात आलेल्या शेवटच्या कसोट सामन्यात ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. यापूर्वी २००३ मध्ये भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळाला होता. द्रविडने या सामन्यात पहिल्या डावात २३३ आणि दुसऱ्या डावात ७२ धावांची नाबाद खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
ट्रेंडिंग लेख-
शंभर शतके ठोकणाऱ्या सचिनला आवडतात स्वतःच्या ‘या’ तीन खेळ्या; दुसरी आहे खूपच खास
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’