सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याच्या कसोटी मालिकेतील, दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. मात्र या नंतर तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळला जाणार होता. परंतु या ठिकाणी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे तिसरा सामना येथे होण्याची शक्यता कमी आहे. या ठिकाणी सामना आयोजित केला जाणार की नाही हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.
मेलबर्न क्रिकेट मैदानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट फॉक्स रविवारी म्हणाले की त्यांना वाटते की तिसरा कसोटी सामना सिडनीत आयोजित केला जावा. मात्र या ठिकाणची परिस्थिती खूपच बिकट आहे. फॉक्स ‘सिडनी मॉर्निग हेराल्ड’ सोबत बोलताना म्हणाले, “क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरीम सीईओ निक हाॅक्ले न्यू साऊथ वेल्सच्या आरोग्य विभागा सोबत मिळून काम करत आहेत आणि मला वाटते आता परिस्थिती खूपच बिकट आहे.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानले पाहिजे
फॉक्स म्हणाले,” त्यांनी जे सांगितले त्या हिशोबाने वाटते की 50-50 सारखी स्थिती आहे. ते म्हणाले सिडनीला अतिरिक्त वेळ देण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानले पाहिजे. कारण आम्हाला सगळ्याना वाटते सामना सिडनीत व्हावा. त्यांना जेवढा जास्त वेळ मिळेल तेवढी त्याठिकाणी सामना होण्याची शक्यता वाढेल. पुढील दोन दिवसात यावर निर्णय घेतला जाईल. मला वाटते आपल्याला पुढील 48 तासात समजेल की त्याठिकाणी सामना आयोजित केला जाऊ शकतो की नाही.”
वेळ पडल्यास आम्ही सामन्याचे आयोजन करण्यास तयार
फॉक्स पुढे म्हणाले, “जसे मी म्हणालो आम्हाला वाटते सिडनीत सामना खेळला जावा. परंतु गरज लागल्यास आम्ही आमच्या ठिकाणी सामना आयोजित करण्यासाठी तयार आहोत. सिडनीच्या उत्तरीय समुद्र किनारी कोरोनाच्या घटना आढळून आल्या आहेत. त्यामुळे तिसरा कसोटी सामना सिडनीत आयोजित केला जावा की नाही यावरून अनिश्चितता निर्माण झाली होती. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीला सुरू होणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव सर्वबाद 195
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 72.3 षटकात सर्वबाद 195 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघाकडून सर्वाधिक जास्त धावा मार्नस लॅब्यूशाने याने केल्या आहेत. त्याने 132 चेंडूचा सामना करताना 48 धावांची खेळी केली. त्याचबरोबर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना जसप्रीत बुमराहने 4, आश्विनने 3, सिराजने 2 आणि जडेजाने 1 विकेट्स घेतली.