मुंबई । भारतीय क्रिकेट संघाने 2018 -19 साली ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर कसोटी मालिकेत विजय मिळवत इतिहास रचला होता. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियात अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला आशियाई देश होता. आता पुन्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू देखील या दौऱ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाजी खूपच मजबूत असून या संघाला पराभूत करणे सोपे नाही, अशी प्रतिक्रिया युवा फलंदाज मार्नस लाबूशेन यांने दिली.
ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लाबूशेन एएनआयशी बोलताना म्हणाला, “भारताविरुद्ध होणार्या मालिकेची आम्ही अतुरतेने वाट पाहत आहोत. आमची फलंदाजी मजबूत झाली आहे. प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका माहित आहे. भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा सामना करणे हे आव्हानात्मक असेल. भारतीय गोलंदाज जगातील सर्वश्रेष्ठ आक्रमणापैकी एक आहे.”
लाबूशेन याने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे कौतुक केले आहे. बुमराह भारतीय संघातील गोलंदाजी मधला एक्स फॅक्टर असल्याचे त्याने सांगितले.
तो म्हणाला, “जसप्रीत बुमराह चेंडूला दोन्ही बाजूने स्विंग करतो. तो अधिक वेगाने गोलंदाजी केल्याने गोलंदाजी मजबूत झाली आहे. आयसीसी क्रमवारीत देखील तो सतत पुढे जात आहे. भारताला हरवण्यासाठी आम्हाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. मला वाटत नाही की, दिवस रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला फायदा होईल. पण आम्हीच सर्वाधिक पिंक बॉल कसोटी सामने खेळले आहेत. क्रिकेट जसजसे पुढे जात आहेत तसतसे आपल्याला अधिक चांगला खेळ करावा लागेल. या खेळाला लवकरच समजून घ्यावे लागणार आहे.”
स्टिव्ह स्मिथच्या बाबतीत तो बोलताना म्हणाला की, “स्टीव्ह स्मिथ आणि मी चांगले मित्र आहोत. मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे. फलंदाजीविषयी मी नेहमीच चर्चा करत असतो. मी त्याला खेळताना पाहतो. काही गोष्टी मी त्याच्याकडून शिकल्या आहेत. आयपीएल टी 20 लीग हे सर्वोत्तम असून त्यात मला खेळण्याची संधी मिळाली तर मी जरूर खेळेन.”