भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. एकदिवसीय व टी२० मालिकेनंतर खेळल्या जाणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला ( बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ) ऍडलेड येथे सुरुवात होणार आहे. हा सामना दिवस-रात्र स्वरूपात खेळवला जाईल. मात्र, या सामन्याच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुर्वनियोजित ऍडलेड कसोटी इतरत्र हलवण्याचा विचार केला जाऊ शकतो.
ऍडलेड येथे कोविड-१९ ची दुसरी लाट; एमसीजीचा कसोटी आयोजनाचा प्रस्ताव
ऍडलेड येथील कोविड-१९ च्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया या सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे. ऍडलेड येथील परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर, हा सामना मेलबर्न येथे खेळविण्यात येईल.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचे (एमसीजी) अध्यक्ष स्टुअर्ट फॉक्स यांनी म्हटले की, “ऍडलेड येथे मागील काही काळापासून, कोविड-१९ रुग्ण नव्याने सापडत आहेत. ही कोविड-१९ ची दुसरी लाट असण्याची शक्यता आहे. नियोजित कसोटीपूर्वी परिस्थिती आटोक्यात आली नाही तर, आम्ही ही आयोजित करण्यासाठी इच्छुक आहोत.”
मालिकेतील दुसरी कसोटी मेलबर्नच्याच मैदानावर खेळली जाणार आहे. साउथ ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर स्टीवन मार्शल यांनी सांगितले की, “परिस्थिती काहीशी बिघडली आहे. मात्र, सध्या जास्त भीतीचे कारण नाही. आम्ही ही कसोटी ऍडलेडमध्येच खेळली जावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु, वातावरण असेच राहील याची शाश्वती नाही.”
एससीजीदेखील दिवस-रात्र कसोटी आयोजनासाठी सज्ज
एमसीजीव्यतिरिक्त सिडनी क्रिकेट ग्राउंड (एससीजी) यांनीदेखील ही कसोटी आयोजित करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. एससीजीचे प्रमुख टोनी शेफर्ड यांनी या गोष्टीवर आपले मत मांडताना म्हटले, “आम्हाला या दिवस-रात्र कसोटी आयोजनाबाबत विचारण्यात आले तर, आम्ही त्यासाठी तयार आहोत. मात्र, साउथ ऑस्ट्रेलिया प्रशासन या सर्व परिस्थितीशी दोन हात करण्यास समर्थ आहे. आम्ही आशा करतो की, कसोटी नियोजित ठिकाणी आणि नियोजित वेळेतच होईल.”
प्रतिष्ठेची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी १७ डिसेंबर पासून सुरू होईल. या मालिकेत चार कसोटी सामने खेळले जातील. भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर पालकत्व रजेमुळे मायदेशी परतणार आहे. उर्वरित तीन सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
बाबर आझम की विराट कोहली? पाकिस्तान सुपर लीगनंतर चाहत्यांनी केली तुलना
धोनीच्या नेतृत्वाखाली अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूने घेतली निवृत्ती
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी
ही ‘त्रिमूर्ती’ गाजवणार आयपीएल २०२१चा मेगा लिलाव; निवृत्त झालेला खेळाडू होणार मालामाल?