भारताचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणाऱ्या मालिकेची सध्या क्रिकेट विश्वात सर्वाधिक चर्चा चाललेली दिसून येतेय. जगभरातील माजी क्रिकेटपटू आणि समीक्षक या मालिकेवर नजर ठेवून आहेत. मालिकेसंबंधी दररोज वेगवेगळे क्रिकेटपटू वेगवेगळी मते मांडताना दिसतायेत. याच पार्श्वभूमीवर, भारताचा दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंह यानेदेखील मालिकेविषयीच्या काही मुद्यांवर आपली मते मांडली. भारतीय संघ रोहित शर्माकडून वीरेंद्र सेहवागसारख्या खेळींची अपेक्षा करू शकतो, असे हरभजनने म्हटले आहे.
रोहितला रोखणे ऑस्ट्रेलियासाठी जाईल अवघड
हरभजनने स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना आगामी भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेविषयी चर्चा केली. हरभजन म्हणाला, “रोहित एक दर्जेदार खेळाडू आहे यात वाद नाही. त्याच्याकडून संघ आणि चाहत्यांना भरपूर अपेक्षा आहेत. रोहित भारतीय खेळपट्ट्यांवर ज्याप्रकारे धावसंख्या उभारतो, त्याच प्रकारच्या खेळ्या त्याने ऑस्ट्रेलियात कराव्या. मला वाटते, रोहित सुरुवातीची पाच षटके सावधगिरीने खेळला, तर त्याला रोखणे ऑस्ट्रेलियासाठी कठीण होईल.”
रोहित सेहवागसारख्या खेळ्या करू शकतो
हरभजनने रोहितची तुलना भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागशी केली. हरभजनने रोहितचे कौतुक करताना म्हटले, “रोहित कसोटी सामन्यांत नव्या चेंडूचा सामना कसा करतो, यावर बरेच काही अवलंबून असेल. तो नवा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळू शकला, तर मी त्याच्याकडून सेहवागसारख्या खेळींची अपेक्षा बाळगतो. रोहित भारताचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. मला आशा आहे की, तो कसोटी मालिकेपूर्वी तंदुरुस्त होईल.”
रोहितने केले होते दमदार पुनरागमन
भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार असलेला रोहित बरीच वर्ष कसोटी संघातून बाहेर होता. २०१९ मध्ये दुखापतग्रस्त केएल राहुलच्या जागी त्याला कसोटी संघात संधी मिळाली. त्या संधीचे सोने करताना रोहितने सलग दोन शतके आणि नंतर द्विशतक झळकावत कसोटी संघातील जागा देखील पक्की केली होती. रोहित, मयंक अगरवालसह आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत भारताचा सलामीवीर म्हणून उतरेल.
दुखापतीतून सावरत आहे रोहित
सध्या रोहित दुखापतीतून सावरत आहे. आयपीएल २०२० वेळी त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला होता. याच कारणाने रोहित भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेला नाही. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी तो भारताचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला मिळायला हवे कसोटी कर्णधारपद, माजी दिग्गजाचे मोठे भाष्य
आयपीएल जिंकल्यानंतर रोहित शर्मा बनला ‘या’ कंपनीचा ब्रॅंड एंबेसेडर; देणार शैक्षणिक क्षेत्रात योगदान