मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने २०२०चा महिला टी२० विश्वचषक जिंकला आहे. त्यांनी तब्बल 5 व्यांदा महिला टी२० विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला आहे. त्याचबरोबर त्यांनी आज अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाला ८५ धावांनी पराभूत करत हे विजेतेपद मिळवले. याबरोबरच या विश्वचषकातील भारताचा विजयी रथही ऑस्ट्रेलियाने रोखला.
भारतीय महिला संघाचा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा पराभव केला आहे. याआधी ऑस्ट्रेलिया महिला संघाने २००५ रोजी भारताला ५० षटकांच्या विश्वचषकात तब्बल ९८ धावांनी पराभुत केले होते. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व करत होती २२ वर्षीय मिताली राज.
त्यानंतर आज पहिल्यांदाच आयसीसीच्या महिलांच्या कोणत्याही स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे संघ अंतिम सामन्यामध्ये आमने सामने आले होते. यामुळे १५ वर्षांपुर्वीच्या त्या पराभवाचा वचपा काढण्याची चांगलीच संधी भारताला चालून आली होती. मात्र भारतीय संघाने ती संधी दवडली.
भारतीय संघ आजपर्यंत केवळ तीन वेळा आयसीसीच्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. याआधी २००५साली ऑस्ट्रेलिया तर २०१७ साली इंग्लंडविरुद्ध भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.






