आयसीसी महिला विश्वचषक २०२२मधील २२वा सामना मंगळवारी (२२ मार्च) हॅमिल्टन येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारत आणि बांगलादेश संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, भारतासाठी हा ‘करा वा मरा’ सामना आहे.
भारतीय संघातील बदल
महिला विश्वचषकाच्या २२व्या सामन्यात भारतीय संघात फिरकीपटू पूनम यादवचे (Poonam Yadav) अंतिम ११ खेळाडूंमध्ये पुनरागमन झाले आहे. तिला मेघना सिंगच्या जागी संधी मिळाली आहे. या स्पर्धेतील तिचा हा पहिलाच सामना आहे. आतापर्यंत खेळलेल्या ५७ वनडे सामन्यात तिने ७९ विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, विश्वचषषकात खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये तिने ११ विकेट्स घेतल्या आहेत.
पाकिस्तानच्या विजयाने भारताला फायदा
महिला विश्वचषकाच्या २०व्या सामन्यात पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघ आमने-सामने होते. या सामन्यात पाकिस्तानने ८ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह वेस्ट इंडिजचा रनरेट आधीपेक्षा आणखी खराब झाला आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचा रनरेट वेस्ट इंडिजपेक्षा चांगला आहे. अशात, भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला, तर भारताची उपांत्य सामन्याची वाट सोपी असेल.
बांगलादेश संघाविरुद्ध भारताचा विक्रम
भारत आणि बांगलादेश संघात आतापर्यंत फक्त ४ वनडे सामने खेळण्यात आले आहेत. या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. शेवटचा सामना ५ वर्षांपूर्वी २०१७साली खेळण्यात आला होता. हा सामना भारताने ९ विकेट्सने खिशात घातला होता. आयसीसी महिला विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांचा सामना करत आहेत. मागील दोन्ही सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे.
सामन्याची आकडेवारी
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या ९ षटकांमध्ये एकही विकेट न गमावता ३९ धावा केल्या आहेत. यामध्ये स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) २१, तर शेफाली वर्मा (Shafali Verma) १६ धावांवर खेळत आहे.
दोन्ही संघ
भारत
स्म्रीती मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, झूलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.
बांगलादेश
शर्मिन अख्तर, मुर्शिदा खातून, फरगना होक, निगार सुल्ताना (कर्णधार), रुमाना अहमद, रितू मोनी, लता मंडल, सलमा खातून, नाहिदा अख्तर, फाहिमा खातून, जहांआरा आलम