कार्डीफ | सोफीया गार्डन्स मैदानावर शुक्रवारी (६ जुलै) झालेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताला पराभूत करत मालिकेत बरोबरी साधली आहे.
इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रीत केले.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय फलंदाजीची आघाडीची फळी कापत जोरदार धक्का दिला.
पहिल्या पाच षटकातच भारतीय संघाची ३ बाद २२ अशी अवस्था झाली.
त्यानंतर फलंदाजीस आलेला कर्णधार विराट कोहली ४७ आणि सुरेश रैनाने २७ धावा करत भारतीय डाव सावरला.
विराट कोहली आणि रैना बाद झाल्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये अनुभवी एमएस धोनीने हार्दिक पांड्याला साथीला घेत भारतीय संघाला २० षटकात ५ बाद १४८ धावांपर्यंत पोहचवले.
यामध्ये धोनीने ३२ तर हार्दिक पांड्याने १२ धावांचे योगदान दिले.
१४९ धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीस उतरलेल्या इंग्लडला भारताच्या उमेश यादवने सुरवातीलाच दोन धक्के देत जेसन रॉय १५ आणि जॉस बटलर १४ यांना बाद करत भारतीय संघाला चांगली सुरवात करुन दिली.
त्यानंतर लगेचच युजवेंद्र चहलने जो रुटला ९ धावांवर बाद करत इंग्लंडची ७ षटकात ३ बाद ४४ अशी अवस्था केली होती.
मात्र त्यानंतर फलंदाजीस आलेल्या अॅलेक्स हेल्सने इंग्लंडसाठी ५८ धावांची खेळी करत इंग्लडचा विजय सोपा केला. या अर्धशतकी खेळीमध्ये हेल्सने ३ षटकार आणि ४ चौकार लगावले.
तसेच या विजयात इंग्लंडच्या जॉनी बेयेस्ट्रोने अॅलेक्स हेल्सला साथ देत २८ धावा करुन इंग्लंडच्या विजयात खारीचा वाटा उचलला.
या विजयाबरोबरच इंग्लंडने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-Video: एमएस धोनीला टीम इंडीयाकडून वाढदिवसाच्या निमित्ताने अशा मिळाल्या खास शुभेच्छा
-तब्बल सहा महिन्यानंतर मोहम्मद शमीच्या आयुष्यात चांगली घटना