भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान अहमदाबाद येथे पाच टी२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तीन सामन्यांनंतर पाहुण्या इंग्लंडने भारतावर २-१ अशी आघाडी घेतली असून, ते मालिका विजयाच्या नजीक आहेत. पहिल्या तीन सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने प्रत्येक वेळी बदल करून संघ खेळवला. मात्र, तरीही यजमान संघ पराभवाच्या छायेत वावरत आहे.
भारतीय संघाला मालिका आपल्या नावे करायची असल्यास उर्वरित दोन सामन्यात कसल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. अशा स्थितीत पहिल्या तीन सामन्यात पूर्णता अपयशी ठरलेल्या तीन खेळाडूंवर चौथ्या सामन्यातून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. आज आपण त्याच तीन खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
१) केएल राहुल
भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल चौथ्या सामन्यात खेळताना दिसेल असे कोणीही छातीठोकपणे सांगणार नाही. कारण, राहुल या मालिकेत भारताचा सर्वात अपयशी खेळाडू ठरला आहे. त्याने तिन्ही सामन्यात भारतासाठी सलामीला येत अनुक्रमे एक, शून्य आणि शून्य अशा धावा केल्या आहेत.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो संघाचा उपकर्णधार होता. मात्र, आता पुढील सामन्यात कदाचित तो संघाचा भाग नसेल. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवचा भारतीय संघात समावेश करून ईशान किशनला सलामीवीर म्हणून बढती देण्यात येईल.
२) युजवेंद्र चहल
सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघात सर्वात अनुभवी फिरकीपटू असलेला युजवेंद्र चहल पुढील सामन्यात बाकावर बसलेला दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. चहलने सुरू असलेल्या मालिकेत तिन्ही सामने खेळताना १२ षटके गोलंदाजी करताना तब्बल ११९ धावा दिल्या आहेत. यामध्ये तो केवळ ३ बळी आपल्या नावे करू शकला. त्याचा फॉर्म खराब असल्याचे स्पष्ट दिसत आहे. चहलच्या जागी यापूर्वी भारतीय संघासाठी एक टी२० सामना खेळलेला राजस्थानचा युवा लेगस्पिनर राहुल चहर याला संधी मिळू शकते.
३) शार्दुल ठाकूर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चमकदार कामगिरी केलेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूर याला टी२० मालिकेत भुवनेश्वर कुमारचा साथीदार म्हणून प्रथमता संधी देण्यात आली. मात्र, तो या संधीचे सोने करू शकला नाही. त्याने मालिकेत फक्त २ बळी आपल्या नावे केले आहेत. तसेच, क्षेत्ररक्षणात ही त्याच्याकडून काही चुका झाल्या. अशा परिस्थितीत, भारतीय कर्णधार विराट कोहली त्याच्या जागी अनुभवी टी२० गोलंदाज दीपक चहरला संधी देऊ शकतो. स्विंग गोलंदाजी करण्यात माहीर असलेला दीपक भारताचा टी२० स्पेशल गोलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मैदानावर पुन्हा घोंगावलं ‘युवी’ नावाचं वादळ! सिक्सर किंगने एकाच षटकात लगावले ४ षटकार; पाहा व्हिडिओ
भारतीय महिला संघाच्या पदरी पुन्हा निराशा, दक्षिण आफ्रिका महिलांचा शानदार मालिकाविजय
नुकताच विवाहबंधनात अडकलेला जसप्रीत बुमराह ‘या’ तारखेला पतरणार क्रिकेटच्या मैदानात






