इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात गुरुवारपासून (०२ सप्टेंबर) केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे चौथा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्यात उभय संघातील खेळाडूंना जुने विक्रम मोडण्याचे आणि नवे विक्रम प्रस्थापित करण्याची संधी असणार आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हादेखील विक्रमवीर बनू शकतो.
इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात बुमराह ३ विकेट्स घेताच महान वेगवान गोलंदाज कपिल देव यांचा विक्रम मोडेल. तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद १०० विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज बनेल. त्याने सध्या २३ कसोटी सामन्यांमध्ये ९७ विकेट्स घेतल्या आहेत. कपिल देव यांच्याविषयी बोलायचे झाल्यास, त्यांनी २५ कसोटी सामन्यांमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण केले होते.
संपूर्ण भारतीय गोलंदाजांमध्ये, सर्वात जलद १०० कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या नावावर आहे. त्याने अवघ्या १८ कसोटी सामन्यांमध्ये ही किमया साधली होती.
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज
भारताकडून आतापर्यंत ७ वेगवान गोलंदाजांनी १०० आणि त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत कपिल देव, झहीर खान, जवागल श्रीनाथ, इशांत शर्मा, कारसन घावरी, इरफान पठाण आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. बुमराहकडे ३ विकेट्स घेत या महान गोलंदाजांच्या यादीतही सहभागी होण्याची संधी असणार आहे.
२७ वर्षीय बुमराहने आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकूण १४ विकेट्स घेतल्या आहेत. त्यातील ९ विकेट्स त्याने नॉटिंघम येथील पहिल्या कसोटी सामन्यात घेतल्या होत्या. त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स चटकावल्या होत्या. त्यामुळे बुमराहसाठी ओव्हल कसोटीत ३ विकेट्स घेणे, जास्त अवघड काम नसेल. त्याने गोलंदाजीत योगदान दिल्यास भारतीय संघ सामना जिंकत मालिकेत २-१ ने आघाडीही घेईल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या रूटला बाद करण्याची ट्रिकही मिळाली आणि गोलंदाजही गवसला, आता फक्त…
ओव्हलवर हॅट्रिक घेणारा ‘हा’ फिरकीपटू अश्विनला न खेळवल्याने थक्क, पण पहिली पसंती मात्र जडेजाला
उत्कंठावर्धक सामना! बरोबरीनंतर सुपर ओव्हरचा थरार, अखेर निकोलसच्या पठ्ठ्यांपुढे पोलार्डचा संघ नामोहरम






