fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पाचवी कसोटी: अॅलिस्टर कूक, जो रुटच्या शतकानंतर टीम इंडिया पराभवाच्या छायेत

लंडन। द ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने चौथ्या दिवसाखेर 3 बाद 58 धावा केल्या आहेत. तसेच अजून भारताला विजयासाठी 406 धावांची आवश्यकता आहे.

तसेच चौथ्या दिवसाखेर भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे 46 आणि 10 धावांवर नाबाद खेळत आहेत.

इंग्लंडने त्यांचा दुसरा डाव 8 बाद 423 धावांवर डाव घोषित केला आणि पहिल्या डावात मिळवलेल्या 40 धावांच्या जोरावर भारतासमोर विजयासाठी 464 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताने पहिल्या डावाप्रमाणे या डावातही शिखर धवनची लवकर विकेट गमावली. त्याला डावाच्या तिसऱ्याच षटकात 1 धावेवर असताना जेम्स अँडरसनने पायचीत बाद केले.

तसेच याच षटकाच्या शेवटच्या चेंडुवर चेतेश्वर पुजारालाही अँडरसनने शून्य धावेवर पायचीत करत बाद केले. त्याच्या पाठोपाठ स्टुअर्ट ब्रॉडने भारताचा कर्णधार विराट कोहलीला जॉनी बेअरस्टोकडे झेल देण्यास भाग पाडले.

विराटला या डावात भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे भारताची आवस्था 3 बाद 2 धावा अशी बिकट झाली. मात्र यानंतर राहुल आणि रहाणेने डाव सावरताना आणखी पडझड होऊ दिली नाही.

तत्पुर्वी इंग्लंडने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात 2 बाद 114 धावांपासून खेळायला सुरुवात केली. यावेळी इंग्लंड कर्णधार जो रुट 29 आणि अॅलिस्टर कूक 46 धावांवर खेळत होते. त्यांनी चौथ्या दिवशीही त्यांचा चांगला खेळ कायम ठेवताना भारतीय गोलंदाजांना सहज यश मिळू दिले नाही.

या दोघांनी शतके करतना तिसऱ्या विकेटसाठी 259 धावांची द्विशतकी भागीदारी रचली. कूकने या डावात 14 चौकारांच्या सहाय्याने 286 चेंडूत 147 धावा करताना आपले शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले.

यावेळी त्याला जवळजवळ 5 मिनिटे प्रेक्षकांनी उभे राहुन टाळ्या वाजवत मानवंदना दिली. तसेच ड्रेसिंग रुममधील त्यांच्या संघसहकाऱ्यांनीही त्याचप्रकारे कूकचे कौतुक केले.

कूक आणि रुट या दोघांनीही खेळपट्टीवर चांगलाच जम बसवलेला असताना विराटने चेंडू  पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या हनुमा विहारीकडे सोपवला. त्यानेही विराटचा विश्वास सार्थ करताना लागोपाठच्या चेंडूंवर रुट आणि कुकला बाद केले.

रुटने कूकला चांगली साथ देताना 190 चेंडूत 125 धावा केल्या. यात त्याने 12 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच हे त्याचे 14 वे कसोटी शतक आहे.

हे दोघेही बाद झाल्यानंतर मात्र बेअरस्टो(18) आणि पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या जॉस बटलरने काही वेळात लगेच विकेट गमावल्या. बटलरला तर एकही धाव करता आली नाही.

पण त्यानंतर पुन्हा एकदा इंग्लंडच्या तळातील फलंदाजांनी चांगली लढत देत धावांची भर घालून इंग्लंडला 400 धावांचा टप्पा पार करुन दिला. यात बेन स्टोक्स(37), सॅम करन(20) आणि आदिल रशीदने(21*) धावा केल्या. यानंतर रुटने इंग्लंडचा डाव घोषित केला.

भारताकडून या डावात रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारीने अनुक्रमे 179 आणि 37 धावात प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीने 110 धावात दोन विकेट्स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक:

इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 332 धावा

भारत पहिला डाव – सर्वबाद 292 धावा

इंग्लंड दुसरा डाव – 8 बाद 423 धावा (घोषित)

भारत दुसरा डाव – 3 बाद 58 धावा

(अजिंक्य रहाणे 10 धावा आणि केएल राहुल 46 धावांवर नाबाद खेळत आहे.)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टॉप ५: शेवटच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या अॅलिस्टर कूकने केले हे खास विक्रम

Video: हनुमा विहारी केला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर यांच्याबरोबर असलेल्या खास नात्याचा खुलासा

 

You might also like