भारतीय संघाचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने खराब फॉर्ममधून पुनरागमन करण्यासाठी कोणता मार्ग अवलंबतो, याचा नुकताच खुलासा केला. ज्यावेळी मी खराब फॉर्ममधून जात असतो त्यावेळी मी माझ्या चुकांवर लक्ष केंद्रित करतो, असे विधान कुलदीप यादवने केले. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटीत संधी न मिळालेल्या कुलदीपला आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळण्याची आशा आहे.
२६ वर्षीय कुलदीपला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केवळ एका वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मर्यादित षटकांच्या सामन्यात युजवेंद्र चहलला संघ व्यवस्थापनाने प्रथम पसंती दिली होती. तर कसोटीत अष्टपैलू फिरकीपटूची गरज असल्याने कुलदीपच्या आधी रवींद्र जडेजा आणि वाॅशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली. मात्र आगामी इंग्लंडविरुद्धची मालिका भारतात होणार असल्याने आणि जडेजा दुखापतग्रस्त असल्याने कुलदीपला खेळण्याची संधी मिळेल.
“चुकांची पुनरावृत्ती टाळण्याकडे कल”
कुलदीप आपला आयपीएलचा संघ कोलकाता नाईट रायडर्सच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “काही वेळा अशी परिस्थिती येते की तुम्ही फार खास कामगिरी करू शकत नसतात. याच वेळी तुम्हाला तुमच्या चुकांकडे लक्ष देनायची गरज असते. कारण त्यावेळी तुम्ही तुमच्या चुकांचे परीक्षण करू शकता आणि भविष्यात त्याच चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेता.”
गेल्या काही काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नव्हे तर आयपीएलमधील कुलदीपच्या कामगिरीतही घसरण झाली आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला, “मी गेली सात वर्षे झाले केकेआरकडून खेळतो आहे. त्यामुळे वरिष्ठ खेळाडू म्हणून माझ्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. तुम्हाला सध्याच्या काळात तुमचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे आहे, जे नक्कीच आव्हानात्मक आहे. आणि विशेषतः चाहत्यांच्या प्रेमामुळे फ्रँचायझी क्रिकेट अधिकच स्पर्धात्मक झाल्याने ते अजूनच कठीण आहे.”
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होते आहे. ही मालिका भारतीय संघासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे कुलदीप देखील आपले सर्वोत्तम प्रदर्शन देत भारतीय संघाला मालिकाविजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल.
महत्वाच्या बातम्या:
पंचांच्या खराब कामगिरीवर संतापले स्टोक्स-ब्रॉड, म्हणाले
PAK vs SA : दिग्गज खेळाडूंना वगळत नवोदितांना संधी, टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर
तो जगातील सर्वोत्तम व्यक्ती, ताहीरने केले या भारतीय खेळाडूचे कौतुक