कोरोना महामारीनंतर भारतातील क्रिकेट पुन्हा नव्याने सुरू झाले आहे. सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीचे बंद दाराआड यशस्वी आयोजन झाले. पाठोपाठ, इंग्लंडच्या भारत दौऱ्याला ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे सुरुवात होईल. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीची लवकरच सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, मुंबई क्रिकेट असोसिएशनने आज (३१ जानेवारी) या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी आपला तब्बल १०४ खेळाडूंचा संभाव्य संघ घोषित केला. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला देखील संघात स्थान दिले गेले आहे.
मुंबईतने जाहीर केला संभाव्य संघ
देशांतर्गत क्रिकेटमधील वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी, मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपला तब्बल १०४ खेळाडूंचा संभाव्य संघ जाहीर केला. हे सर्व खेळाडू १ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विशेष सराव शिबिरात सहभागी होतील.
संघटनेने जाहीर केलेल्या संघात श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, शिवम दुबे, पृथ्वी शॉ या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सरफराज खान, अरमान जाफर व सिद्धेश लाड या देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या खेळाडूंना देखील संघात सामील करण्यात आले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून वरिष्ठ स्तरावरील क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हादेखील या संघात स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला.
भारतातील प्रमुख स्पर्धा आहे विजय हजारे ट्रॉफी
कोरोनामुळे बीसीसीआयने भारतातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेला रद्द करण्याचे ठरवले. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीला महत्व प्राप्त झाले आहे. २००३ सालापासून आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेचा तमिळनाडू सर्वात यशस्वी संघ आहे. तमिळनाडूने आतापर्यंत पाच वेळा हि स्पर्धा जिंकण्याचा कारनामा केलेला दिसून येतो. कर्नाटक संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे.
महत्वाच्या बातम्या:
PAK vs SA : दिग्गज खेळाडूंना वगळत नवोदितांना संधी, टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर
जो रुट व्यतिरिक्त इंग्लंडचे हे ४ खेळाडू देखील ठरू शकतात भारतीय संघासाठी डोकेदुखी
इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीसाठी टीम इंडियात निवड झालेले ३ महाराष्ट्रीयन खेळाडू






