---Advertisement---

पहिल्या ३ कसोटीत कोहली, रहाणे अन् पुजारा घालणार धावांचा रतीब, माजी कर्णधाराचा दावा

On: शनिवार, जुलै 31, 2021 1:50 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तत्पुर्वी इंग्लंडच्याच मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडच्या हातून ८ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडमधील साउथम्पटनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात एकाही भारतीय फलंदाजाला साधे अर्धशतकही करता आले नव्हते.

त्यामुळे भारताचे फलंदाज इंग्लंडविरुद्धही संघर्ष करताना दिसू शकतात असे म्हटले जात आहे. मात्र माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचे याबाबतील वेगळेच मत आहे. ऑगस्ट महिन्यात इंग्लंडची खेळपट्टी गोलंदाजांना नव्हे तर फलंदाजांना मदत करते, असे त्यांचे म्हणणे आहे.

आपल्या अधिकृट ट्विटर अकाउंटवर ट्विट करत अझरुद्दीन यांनी यांसदर्भात दावा केला आहे. ‘ऑगस्ट महिना इंग्लंडमध्ये धावा करण्यासाठी सर्वोत्तम आहे. माझ्या अनुभवानुसार, या काळात इंग्लंडची खेळपट्टी कोरडी असते आणि फलंदाज अशा परिस्थितीत धुव्वादार फटकेबाजी करू शकतात. त्यामुळे फलंदाजांनी या गोष्टीचा जरुर फायदा घ्यायला पाहिजे,’ असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.

अझरुद्दीन यांच्या दाव्यानुसार इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील सुरुवातीच्या ३ कसोटी सामन्यात धावांचा वर्षाव होताना पाहायला मिळू शकतो. कारण पहिला कसोटी सामना ४-८ ऑगस्ट दरम्यान नॉटिंघम येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत लॉर्ड्सच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. त्यानंतर २५ ते २९ ऑगस्टदरम्यान लिड्स येथे तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यापुढील अखेरचे २ कसोटी सामने सप्टेंबरमध्ये खेळवले जाणार आहेत.

अशात सुरुवातीच्या ३ कसोटी सामन्यांमध्यो भारतीय संघातील फलंदाजांकडून मोठमोठ्या खेळींची अपेक्षा असेल. त्यातही कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यांच्यावर सर्वांची नजर असेल. कारण मागील २०१८ सालच्या कसोटी मालिकेत या तिघांनी इंग्लंडमध्ये धावांचा रतीब घातला होता. कोहली ५९३ धावांसह सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला होता. विशेष म्हणजे, त्यावेळी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ४ सामने हे ऑगस्ट महिन्यातच झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---