---Advertisement---

‘अश्विनने जे साध्य केले, ते सर्वांनाच साध्य करता येत नाही’, प्रशिक्षक द्रविडने उधळली स्तुतीसुमने

On: बुधवार, डिसेंबर 1, 2021 12:10 AM
R-Ashwin-and-Cheteshwar-Pujara
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. त्या सामन्यात भारत एका क्षणी विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते, पण न्यूझीलंड संघाने शेवटपर्यंत किल्ला लढवला आणि सामना अनिर्णित राखला. पण असे असले तरी, कानपूर येथे झालेल्या या कसोटीत आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने सगळ्यांना प्रभावित करणाऱ्या रविचंद्रन अश्विनचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी देखील अश्विनचे कौतुक केले आहे.

द्रविडने अश्विनवर कौतुकाचा वर्षाव केला, त्यांनी म्हटले की, तो नेहमीच कसोटी क्रिकेटमध्ये ‘मॅच विनर’ राहिला आहे, कसोटी क्रिकेटमध्ये तो नेहमीच नवीन गोष्टी शिकत असतो. त्यामुळे खूप चांगला ऑफ-स्पिनर बनला आहे. अश्विनने या कसोटीत खेळताना ४१९ विकेट्स पूर्ण केल्या. याबरोबरच सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो हरभजन सिंगला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर आला.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल द्रविड म्हणाले, ‘मला वाटते हे एक मोठी यश आहे. भारतासाठी भरपूर क्रिकेट खेळणारा, चांगली गोलंदाजी करणारा हरभजन सिंग देशासाठी किती महान गोलंदाज होता, हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. अशा परिस्थितीत अश्विनने केवळ ८० कसोटी सामने खेळून एवढ्या मोठ्या गोलंदाजाला मागे सोडले, यावरून तो खेळासाठी किती समर्पित आहे हे दिसून येते.’

‘अश्विन हा अशा खेळाडूंपैकी एक आहे, जो भारतासाठी नेहमीच मॅच विनर खेळाडू ठरला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी गोलंदाजी करणे कठीण होत असतानाही त्याने ११ षटकांच्या स्पेलमध्ये विकेट घेत संघाला सावरले आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना जिवंत ठेवला. नेहमीच विकेट घेण्याची भूक हा त्याच्या कौशल्याचा आणि क्षमतेचा परिणाम आहे.’

द्रविडने तामिळनाडूच्या या दिग्गज फिरकीपटूचे कौतुक केले आणि सांगितले की, ‘गेल्या काही वर्षांत अश्विनची गोलंदाजी खूप विकसित झाली आहे आणि तो त्यात सातत्याने भर घालत आहे. तो अशा खेळाडूंपैकी एक आहे जो सतत आपल्या खेळाचा विचार करतो आणि वेळेनुसार चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो, म्हणूनच तो आज या ठिकाणी पोहचला आहे. अश्विनने जे साध्य केले ते सर्वांनाच साध्य करता येत नाही. असा खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये असणे आणि त्याच्यासोबत काम करणे ही भाग्याची गोष्ट आहे. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे.’

कानपूर कसोटीमध्ये रविचंद्रन अश्विनने (४१९ विकेट) हरभजन सिंगला (४१७ विकेट्स) मागे टाकून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. आता तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या माजी अष्टपैलू कपिल देव (४३४ विकेट) यांना मागे टाकण्याच्या मार्गावर आहे.

भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे (६१९ विकेट्स) याच्या नावावर आहे. अश्विनने हरभजन सिंगला मागे टाकण्यासाठी केवळ ८० कसोटी सामने घेतले आहेत आणि हा विक्रम करण्यासाठी त्याने हरभजनपेक्षा ४० डाव कमी खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताच्या ‘या’ जखमी क्रिकेटरने मुंबई कसोटीआधी केली सरावाला सुरुवात, किवींना फोडणार घाम

कसोटी सामना सुरु असतानाच ‘या’ महत्त्वाच्या सदस्याने सोडली पाकिस्तान संघाची साथ

श्रेयसने सांगितला अश्विनसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यावेळी वानखेडेत बॉल बॉय होता शतकवीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---