---Advertisement---

टीम इंडियाच्या फलंदाजांना पदार्पणाच्या सामन्यातच टेंशन देणाऱ्या जेमिसनबद्दल घ्या जाणून

---Advertisement---

कालपासून (21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात (NZ Vs IND) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला. या सामन्यात आज भारताचा पहिला डाव 165 धावांवर संपुष्टात आला. यावेळी कसोटी क्रमवारीत जगभरात अव्वल स्थान पटकावणारा भारतीय संघ यजमान न्यूझीलंजच्या गोलंदाजीपुढे संघर्ष करताना दिसला.

न्यूझीलंडकडून या डावात टीम साऊथी आणि काईल जेमिसनने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्टने 1 विकेट घेतली. विशेष म्हणजे जेमिसनचा हा पहिलाच कसोटी सामना आहे.

त्याने भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराला 11 धावांवर बाद करत पहिली कसोटी विकेट घेतली. पुजारा पाठोपाठ 18 व्या षटकात जेमिसनने भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले. त्यानंतर त्याने काल विहारीला 7 धावांवर बाद केले.

तर आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इशांत शर्माला बाद करत कसोटी कारकिर्दीच्या पहिल्याच डावात 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. एवढेच नाही तर जेमिसनने क्षेत्ररक्षण करतानाही भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालचा ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर लाँग लेगला झेल घेतला.

अशी आहे जेमिसनची या सामन्याआधीची कामगिरी – 

या 25 वर्षीय गोलंदाजा जेमिसनने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. ऑकलंड संघाकडून जेमिसनने एकूण 25 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 72 विकेट्स आहेत. तर, एका सामन्यात 3 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तसेच, अ दर्जाच्या 27 सामन्यात त्याने 35 विकेट्स घेतल्या आहेत.

याचबरोबर  मागील महिन्यात भारत अ संघाविरुद्ध न्यूझीलंड अ संघाकडून 3 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 6 विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी अखेरच्या सामन्यात त्याने 9.4 षटकात 49 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

याबरोबरच जेमिसनला डिसेंबर 2019मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 2 कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंड संघात स्थान दिले होते. मात्र त्याला अंतिम 11 जणांच्या संघात खेळवण्यात आले नाही.

तसेच त्यानंतर त्याला भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यासाठीही 11 जणांच्या न्यूझीलंड संघात स्थान मिळाले नाही. परंतु, या मालिकेदरम्यान न्यूझीलंडचे काही खेळाडू आजारी असल्याने त्याने दुसऱ्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

जेमिसनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणही अविस्मरणीय – 

जेमिसनने याआधी भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यातून 8 फेब्रुवारीला वनडेबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळीही त्याने शानदार कामगिरी करताना नाबाद 25 धावा केल्या होत्या आणि 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी त्याने पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनीची विकेट घेतली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.

न्यूझीलंडचा सर्वात उंच गोलंदाज – 

जेमिसन क्रिकेटमधील सर्वाधिक उंची असणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्याची 6 फूट 8 इंच एवढी उंची आहे. तसेच तो न्यूझीलंडचा सर्वात उंच क्रिकेटपटू आहे. त्याला त्याच्या उंचीमुळे उसळणाऱ्या खेळपट्टीवर गोलंगाजी करताना स्विंगबरोबरच अतिरिक्त उसळीही मिळते.

https://twitter.com/Maha_Sports/status/1231135220830818304

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---