आयसीसी अंडर19 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर सिक्समधील शेवटचा सामना भारत आणि पाकिस्तान दरम्यान खेळला जाणार आहे. हा सामना (1 फेब्रुवारी) रोजी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही युवा संघांचे लक्ष आता उपांत्य फेरीत (सेमीफायनल) आपले स्थान निश्चित करण्यावर असेल. पाकिस्तानच्या संघाला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागेल. त्यामुळेच चाहत्यांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या असून, हा सामना कधी आणि कुठे पाहता येईल, हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत.
भारत आणि पाकिस्तान अंडर19 क्रिकेट संघांमधील हा सामना क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो येथे दुपारी 1:00 वाजल्यापासून खेळवला जाईल. तसेच, दुपारी 12:30 वाजता या सामन्याचा टॉस (नाणेफेक) होईल. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यावर पावसाचे सावट असल्याने, टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. क्रिकेट चाहते या सामन्याचा आनंद टीव्हीवर ‘स्टार स्पोर्ट्स’ वाहिनीवर घेऊ शकतात. तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘जिओ हॉटस्टार’ (JioHotstar) ॲप आणि त्यांच्या वेबसाइटवर हा सामना थेट पाहता येईल.
पाकिस्तानसाठी समीर मिन्हास फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत आहे, तर गोलंदाजीमध्ये अली रझा आणि अब्दुल सुभान यांनी छाप पाडली आहे. दुसरीकडे, भारतीय संघासाठी गोलंदाजीत हेनिल पटेलने सर्वांना प्रभावित केले आहे. फलंदाजीमध्ये वैभव सूर्यवंशी आणि अभिज्ञान कुंडू यांनीही अप्रतिम खेळ दाखवला आहे. तसेच विहान मल्होत्रा आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी चेंडू आणि बॅट अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी केली आहे.






