टी२० विश्वचषक स्पर्धेत बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत आपला पहिला विजय नोंदवला होता. भारतीय संघासाठी शुक्रवारी (५ नोव्हेंबर) पुन्हा करा किंवा मराची लढत आहे. उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला स्कॉटलंडला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागणार आहे.
या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला, तर संघाला थेट स्पर्धेतून बाहेर पडावे लागू शकते. तसे पाहता भारतीय संघ स्कॉटलंड पेक्षा मजबूत आहे, पण टी२० क्रिकेटमध्ये कधी बाजी पालटले हे सांगता येत नाही. गेल्या सामन्यात स्कॉटलंड संघाने न्यूझीलंडला विजयासाठी घाम गाळायला लावला होता.
तसेच सामन्यादरम्यानचे वातावरण देखील महत्वाची भूमिका बजावत असते. भारत विरुद्ध स्कॉटलंड सामन्यात दुबईच्या वातावरणाबाबत मोठी माहिती मिळाली आहे.
दुबई येथील हवामान विभागानुसार, शुक्रवारी (५ नोव्हेंबर) संध्याकाळी दुबईचे हवामान मोकळे असेल. तापमान २९ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. म्हणजेच क्रिकेटसाठी योग्य हवामान राहील. या दरम्यान वारे दक्षिणेकडून पूर्वेकडे ताशी ६ किलोमीटर वेगाने वाहतील, तर आर्द्रता ६४ टक्के राहण्याची शक्यता आहे.
‘दव’ पासून राहावे लागेल सावधान
दुबईत पावसाची शक्यता नाही, पण खेळाडूंना सामन्यादरम्यान दवाला सामोरे जावे लागू शकते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिवस जसजसा पुढे जाईल, तसतसे मोठ्या प्रमाणात दव पडू शकते. म्हणजेच दुसऱ्या डावात गोलंदाजांसमोर कठीण आव्हान असेल. अशा स्थितीत नाणेफेक पुन्हा एकदा मोठी बाब ठरू शकते. भारतीय कर्णधार विराटने आतापर्यंत या स्पर्धेत एकदाही नाणेफेक जिंकलेली नाही. या सामन्यात काय होते ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघासाठी गेल्या १४ पैकी १३ वेळा नाणेफेक गमावली आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे भारताचा नेट रनरेटही खालावला होता. आता भारतासाठी प्रत्येक सामना ‘करा किंवा मरा’ असा आहे. पाकिस्तानने सलग चार विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली असून, न्यूझीलंडचीही गट २ मधून उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता प्रबळ आहे. जर, न्यूझीलंड नामिबिया किंवा अफगाणिस्तानकडून हरले, तर भारताच्या आशा पल्लवित होऊ शकतात.
भारतीय संघाला त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. चांगली गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा नेट रनरेट आता चांगला झाला आहे. तर, अफगाणिस्तान संघाचा नेट रनरेट ३.०९७ वरून १.४८१ वर घसरला आहे. भारतीय संघाने स्कॉटलंड आणि नामिबियाला मोठ्या फरकाने पराभूत केले, तर त्यांचा नेट रनरेट अफगाणिस्तानपेक्षा चांगला असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
दीपक चाहरची बहीण करणार मोठ्या पडद्यावर पदार्पण, ‘या’ तमिळ चित्रपटात झळकणार
हार्दिकला मुंबई इंडियन्स रिटेन करण्याची शक्यता नगण्य! ‘या’ ५ संघांची असेल अष्टपैलू खेळाडूवर नजर