दक्षिण आफ्रिका संघ आपला नवीन कर्णधार क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) आणि प्रशिक्षक मार्क बाऊचरसमवेत (Mark Boucher) 4 वर्षांनंतर वनडे मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यात येणार आहे.
आयपीएलपूर्वी होणारी भारताची ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका आहे. यापूर्वी यावर्षी भारतीय संघाने जानेवारी 2020मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला वनडे मालिकेत 2-1ने पराभूत केले होते. तर फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताला 0-3ने पराभूत व्हावे लागले होते.
आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात वनडे मालिकेतील पहिला सामना 12 मार्चला धरमशाला येथे होणार आहे. तर दुसरा सामना 15 मार्चला लखनऊमध्ये आणि तिसरा सामना 18 मार्चला कोलकातामध्ये खेळण्यात येणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मागील 10 वर्षांमध्ये 5 वनडे मालिका खेळण्यात आल्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 3 तर भारताने 2 मालिका जिंकल्या आहेत. या दोन्ही संघात 2015 मध्ये भारतात शेवटची वनडे मालिका खेळवण्यात आली होती. यावेळी दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 3-2ने पराभव केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका संघ भारतात वनडे मालिका खेळण्यासाठी येत आहे.
दोन्हीही संघांनी भारतात आतापर्यंत 6 वनडे मालिका खेळल्या आहेत. यामध्ये भारतीय संघ 4 मालिकेत विजयी झाला होता. तर एक मालिका गमवावी लागली होती आणि एक मालिका अनिर्णित राहिली होती.
सध्या दक्षिण आफ्रिका संघ चांगल्या लयीत आहे. त्यांनी याच महिन्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाला व्हाईटवॉश दिला होता. तर इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत बरोबरी केली होती.
भारतीय संघाला या वर्षाच्या सुरुवातीपासूनच खेळाडूंच्या दुखापतीला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये भारताचे महत्त्वाचे 4 खेळाडू सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan), वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांना दुखापतींमुळे संघातून बाहेर रहावे लागले होते.
पण आता हार्दिक, भुवनेश्वर आणि शिखर यांचे दुखापतीतून सावरल्यानंतर या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आतापर्यंत 84 वनडे सामने खेळण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघ 35 सामने तर दक्षिण आफ्रिका संघाने 46 सामने जिंकले आहेत. तसेच यातील 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.
वरील आकडेवारी पाहता भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध यशाची टक्केवारी ही 42 टक्के आहे. भारतात हे दोन्ही संघ 51 वेळा एकमेकांसमोर आली आहेत. यामध्ये भारताने 27 सामन्यात विजय तर 21 सामन्यात पराभव मिळवला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिखर धवन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, केएल राहुल, रिषभ पंंत, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव.
भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिका संघ-
क्विंटॉन डी कॉक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), तेंबा बाऊमा, रस्सी व्हॅन दर दसेन, फाफ डू प्लेसिस, काईल वेरिन, हेन्रीच क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, अँडील फेहलुक्वायो, लुंगी एन्गिडी, लुथो सिपाम्ला, ब्यूरान हेन्ड्रिक्स, एन्रीच नोर्जे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, जानेमन मलान.
महत्त्वाच्या बातम्या-
-मद्रास हायकोर्टात आयपीएल रद्द करण्याची याचिका दाखल!
–३९ वर्षीय मोहम्मद कैफने पकडला भन्नाट झेल, चाहत्यांना आठवले जूने दिवस!